मुंबई : विशेष प्रतिनिधी
महायुती आणि ‘मविआ’चा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करण्यावरून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये खडाखडी सुरू असतानाच ‘मला मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागलेले नाहीत’, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:हून घोषित केले. एकिकडे शिंदे यांचा उद्वेग बाहेर पडत असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर सूचक मौन बाळगले.
विधानसभा निवडणुकीचे रणश्ािंग वाजल्यानंतर महाराष्ट्रामध्ये प्रचाराच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. राज्यात सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षांतील महाविकास आघाडी यांच्यातच मुख्य लढत रंगणार आहे. मात्र मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असावा आणि तो घोषित करावा का, यावरून मतभेद आहेत. सत्ताधारी महायुतीनेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव पुढील मुख्यमंत्री म्हणून जाहीर केलेले नाही. मात्र महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेह-याबाबत सूचक विधान केले. एकंदरीत महायुतीत देखील भावी मुख्यमंत्र्याविषयी अद्याप एकमत नसून या ‘ति-घाडी’मध्ये बेबनावाचे वारे घुमत असल्याचे दिसू लागले आहे.
पत्रकार परिषदेमध्ये महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल, अशी विचारणा करण्यात आली असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्हाला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करण्याची गरज नाही. आमचे मुख्यमंत्री तर इथे बसलेले आहेत. मात्र फडणवीस यांनी या दरम्यान मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून कुणाचंही नाव घेतलं नाही. यावेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडीने शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा, असे आव्हान दिले.
फडणवीस पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करत नाही आहे, कारण निवडणुकीनंतर त्यांचा मुख्यमंत्री बनेल, असं त्यांना वाटत नाही. मी शरद पवार यांना आव्हान देतो की, त्यांनी आपला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा.
दरम्यान, यावेळी एकनाथ श्ािंदे यांनीही महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेह-याबाबत स्पष्टपणे काहीही विधान केलं नाही. आमच्या सरकारचं दोन वर्षांपासूनचं काम आणि कामगिरी हाच महायुतीचा चेहरा आहे. आता महाविकास आघाडीने त्यांच्या नेत्याला आपला चेहरा घोषित केलं पाहिजे, असे ते म्हणाले.