19.1 C
Latur
Thursday, January 2, 2025
Homeमहाराष्ट्र‘मनसे’च्या इंजिनला नवनिर्माणाची पर्वणी

‘मनसे’च्या इंजिनला नवनिर्माणाची पर्वणी

मुंबई : विशेष प्रतिनिधी
युती-आघाड्यांची भाकरी यंदा पूर्णपणे फिरली आहे. जे कधी एकत्र येतील असं वाटलं नव्हतं असे राजकीय पक्ष एकत्र आले. त्यामुळे विधानसभा मतदार संघातील मतांची गणितं बदलली आहेत. सध्याची परिस्थिती अशी आहे की जिथे ठाकरे गटाचा उमेदवार असेल तिथे काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ठाकरे गटासाठी काम करावे लागणार आहे. तर भाजप आणि श्ािंदे गटाचा उमेदवार असेल तिथे अजित पवारांच्या केडरला काम करावे लागेल. त्यामुळे वोट ट्रान्सफरचा मुद्दा अत्यंत कळीचा ठरणार आहे. आता मतदारांचा होणारा संभ्रम मनसेच्या फायद्याचा ठरू शकतो असेही बोलले जात आहे. त्यात मुंबईतील काही जागांवर मनसेला आश्वासक चित्र दिसत आहे.

मुंबईतील शहर आणि उपनगर या दोन जिल्ह्यांत एकूण ३६ विधानसभा मतदारसंघ आहेत. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन भाजप आणि शिवसेना महायुतीचे ३० आमदार निवडून आले होते. तर काँग्रेसचे ४, राष्ट्रवादी १ आणि सपाचे १ आमदार निवडून आले होते. मात्र, राजकीय समीकरण बदललं त्यामुळे मुंबईत आता भाजपचे १६, उद्धवसेनेचे ८, श्ािंदेसेनेचे ६, काँग्रेसचे ४, राष्ट्रवादी (अजित पवार गट) १ आणि समाजवादी पक्ष १ असे आमदार आहेत.

सध्या महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन खलबतं सुरू आहेत. पण या सगळ्यात स्थानिक पातळीवर नाराजीनाट्य रंगणार हे नक्की. त्यामुळे मतदारांना युती-आघाडीच्या राजकारणात वेगळा पर्याय म्हणून मनसे स्वत:ला प्रोजेक्ट करत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत मनसेने २५ उमेदवार दिले होते. त्यातील ६ विधानसभा मतदारसंघांमध्ये मनसेच्या उमेदवारांनी दुस-या क्रमांकाची मते घेतली होती.

राज ठाकरे यांची भाषणं, जाहीर सभा हिच पक्षाची खरी ताकद आहे. त्यात मराठी मतदारांमध्ये आजही मनसेबाबत सॉफ्ट कॉर्नर पाहायला मिळतो. आता जसजसा प्रचाराचा रंग चढेल त्यात मनसे आपले रंग भरण्यात यशस्वी होईल का? आणि यंदा तरी ‘मनसे’चे इंजिन मुंबईत धावेल का? याकडे सा-यांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR