४५ जागांवर खल सुरूच, जागांची होणार आदलाबदल?
मुंबई : प्रतिनिधी
महायुतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम झाला असल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप ४५ जागांवर खल सुरू आहे. या जागा सोडण्यावरून महायुतीतील स्थानिक पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे अद्याप त्यावर निर्णय होऊ शकलेला नाही. अशा स्थितीत काही ठिकाणी जागांची आदलाबदल करावी लागणार आहे. त्यामुळे इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. दरम्यान, पुढील ३-४ दिवसांत तोडगा काढून ही यादी दिल्लीला पाठवली जाणार असल्याचे भाजपमधील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. दरम्यान, महायुतीचे प्रमुख नेते रात्री दिल्लीत दाखल झाले. तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती.
आचारसंहिता लागताच महायुतीत जागावाटप णि उमेदवार निश्चितीच्या प्रक्रियेला गती आली आहे. राजधानी दिल्लीत बैठकांचे सत्र सुरू आहे. केंद्रीय संसदीय मंडळातर्फे भाजप उमेदवारांच्या निश्चितीवर मोहर उमटवली जाणार आहे. तत्पूर्वी राजधानी दिल्लीत राज्याच्या भाजप नेत्यांसमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत जागावाटप आणि उमेदवारीवर खल झाला आहे.
दरम्यान, भाजपची पहिली यादी ११३ जणांची असणार आहे. ती कधीही जाहीर होऊ शकते. यामध्ये मंत्र्यांसह जिंकण्याची हमी असलेल्या जागांचा समावेश असणार आहे. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची यादीही जाहीर होणार आहे. परंतु अजूनही महायुतीत ४५ जागांवर एकमत झालेले नाही. उलट त्यावर सध्या खल सुरू असून, यावरून तिन्ही मित्रपक्षांत रस्सीखेच सुरू आहे. या जागांवरून कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. त्यामुळे ऐनवेळी जागांची आदलाबदलही होऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, पुढील ३-४ दिवसांत हा विषय संपेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
महायुतीत भाजपला १६०, शिवसेनेला ७० आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला ५८ जागा मिळणार असल्याची चर्चा आहे. पण हे जागावाटप करताना महायुतीत ४५ जागांवर रस्सीखेच सुरू आहे. यामध्ये वडगाव शेरी, भोर, शिरुर, चंदगड, संगमनेर, आष्टी, गेवराई, यासह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि मुंबईतील जागांवर चर्चा सुरू असल्याचे समजते. यावर मतैक्य होत नसल्याचे चित्र आहे.
महायुतीच्या नेत्यांची
शाहांसोबत बैठक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार शुक्रवारी रात्री दिल्लीत दाखल झाले. या नेत्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. या बैठकीत जागावाटपाबाबत अंतिम शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. जागावाटपावर अद्याप एकमत न झाल्याने दिल्लीत यावर तोडगा निघू शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
९० टक्के जागांवर एकमत
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पुण्यात बोलताना महायुतीचे ९० टक्के जागांचे वाटप झालेले आहे. आता फक्त १० टक्के जागावाटप राहिले आहे. त्यावरही लवकरच चर्चा करून मार्ग काढला जाईल, असे म्हटले.