22.4 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रमहाविकास आघाडीत वादावर पडला पडदा

महाविकास आघाडीत वादावर पडला पडदा

तुटेपर्यंत ताणू नका : ठाकरे, पवारांनी केली मध्यस्थी
मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी व महायुतीमधील जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. त्यातच आज महाविकास आघाडीच्या बैठकीत शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यावरून महाविकास आघाडीत वाद निर्माण झाल्याचे बोलले जात होते. यावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयमी भूमिका घेत जागावाटपावेळी खेचाखेची होत असते. परंतु तुटेपर्यंत ताणायचे नसते, हे सगळ््यांना लक्षात ठेवायला हवे, असा सल्ला दिला तर शरद पवार यांनी थेट कॉंग्रेस पक्षश्रेष्ठीशी संवाद साधला. त्यामुळे या वादावर पडदा पडल्याचे बोलले जात आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील काँग्रेसचे नेतृत्व हे जागावाटपाच्या चर्चेसाठी सक्षम नसल्याचे म्हटले होते. त्यावर नाना पटोले यांनीही थेट पत्रकार परिषदेतूनच पलटवार केला. त्यामुळे नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला. यावर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका वाक्यातच या वादावर प्रतिक्रिया दिली तर दुसरीकडे शरद पवारांनीही दिल्लीतील नेत्यांशी फोनवर चर्चा केली.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज राज्य निवडणूक आयुक्त चोकलिंगम यांची भेट घेतली. त्यानंतर शिवसेनेच्या शिवालय जनसंपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन नाना पटोलेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले. त्यानंतर त्यांनी थेट खा. संजय राऊत यांच्याबद्दल नाराजी बोलून दाखविली. याबाबत उद्धव ठाकरे यांनी याबाबत मी माहिती घेईन आणि तुमच्याशी बोलेन, असे एका वाक्यात उत्तर दिले. जास्त पक्ष असल्यास ओढाताण होते. प्रत्येक पक्षाला जागा हवी असते. मात्र, ओढाताण एवढी होऊ नये की ती तुटेल, याचे भान सर्व नेत्यांना असायला हवे, असे ठाकरे म्हणाले. दुसरीकडे शरद पवार यांनीही दिल्लीतील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना फोन करून जागावाटपावर चर्चा केल्याची माहिती आहे.

दोन दिवसांत जागावाटप
जागावाटपाच्या मुद्यावरून महाविकास आघाडीतील मतभेद आज उघड झाले. मात्र, यावर उद्धव ठाकरे यांनी संयमी भूमिका घेतली. तसेच खुद्द शरद पवार यांनी थेट दिल्लीतील कॉंग्रेस नेत्यांशी फोनवरून चर्चा केली. त्यांनी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी चेन्नीथला आणि के. सी. वेणुगोपाल यांच्याशी चर्चा केल्याचे समजते. दरम्यान, दोन ते तीन दिवसांत महाविकास आघाडीतील जागावाटप होईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR