३ नेते ठाकरे गटात, दोन मंत्री, एक आमदार अडचणीत
मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतरांना वेग आला आहे. महायुतीमधील तीन नेत्यांनी ठाकरेसेनेत प्रवेश केला आहे. त्यात भाजपचे नेते माजी आमदार राजन तेली, अजित पवार गटाचे दीपकआबा साळुंखे आणि सिल्लोडचे भाजप नेते सुरेश बनकर यांनी मशाल हाती घेतली. हे तिन्ही नेते शिंदेसेनेचे दोन मंत्री आणि एका आमदाराच्या मतदारसंघातील आहेत. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची कोंडी होणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून ४० आमदारांना आपल्यासोबत नेले होते. शिंदेंना बंडात साथ देणा-या आमदारांना विधानसभेत धूळ चारण्यासाठी ठाकरेंनी फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे. त्याच रणनीतीचा भाग म्हणून मातोश्रीवर आज तीन नेत्यांचा पक्षप्रवेश झाला. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी आमदार दीपकआबा साळुंखे यांनी मशाल हाती घेतली. ते राष्ट्रवादीचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष होते. आता ते सांगोल्यात शिंदेसेनेचे शहाजीबापू पाटील यांच्याविरोधात मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
भाजपचे नेते आणि माजी आमदार राजन तेली यांनीही ठाकरेसेनेत प्रवेश केला. तब्बल १९ वर्षांनी त्यांनी घरवापसी केली. त्यांना सावंतवाडीतून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. मंत्री दीपक केसरकर हे शिंदे गटाचे आहेत. त्यांच्या विरोधात राजन तेली मैदानात उतरणार आहेत.
सत्तारांना आव्हान
देणार सुरेश बनकर
सिल्लोडचे भाजप नेते सुरेश बनकर यांनीही शेकडो कार्यकर्त्यांसह ठाकरेसेनेत प्रवेश केला. त्यांनी आपल्यासोबत २०० गाड्यांचा ताफा आणला होता. सिल्लोडचे शिंदे गटाचे आमदार तथा मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात मैदानात उतरू शकतात.