हिंगोली : बाहेरगावी असणा-या मतदारांना फोनपे वरून पैसे पाठविण्याचे आमिष अडचणीत आलेले शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांना निवडणूक आयोगाने दणका दिला आहे. बांगर यांना २४ तासांमध्ये खुलासा करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
त्यामुळे संतोष बांगर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, संतोष बांगर यांना निवडणूक आयोगाकडून खुलासा करण्याचा आदेश आल्यानंतर एबीपी माझाने त्यांच्याशी संवाद साधला. मात्र, संतोष बांगर यांनी सर्व आरोप फेटाळून लावताना तो व्हीडीओ आपला नसल्याचे म्हटले आहे. इतकेच नव्हे तर फोन पे चा अर्थ मला माहित नाही, गुगल पे सुद्धा माहित नाही असेही संतोष बांगर यांनी म्हटले आहे.
बांगर यांनी सांगितले की मी कोणतीही वक्तव्य केलेली नाही. ती विरोधकांनी तयार केलेली कॉपी आहे. त्यामुळे माझ्या विरोधात जे काही झाले आहे ते सर्व चुकीचे आहे. विरोधकांकडे काही काम राहिलेले नाही, असा आरोप त्यांनी केला. आपल्याला निवडणूक आयोगाकडून नोटीस आलेली नाही. नोटीस आल्यानंतर नंतर सुद्धा हाच खुलासा करणार असल्याचे संतोष बांगर म्हणाले. तो व्हीडीओ माझाच आहे, पण एडिट करून आवाज लावलेला दिसतो असा दावा सुद्धा संतोष बांगर यांनी केला. ते पुढे म्हणाले की फोन पे चा अर्थ मला माहित नाही. गुगल पे सुद्धा मला माहित नसल्याचे संतोष बांगर यावेळी म्हणाले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. हिंगोली जिल्ह्यात देखील राजकीय वातावरण चांगलच तापल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, उमेदवारी जाहीर होण्याअगोदरच आमदार संतोष बागर यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख फिक्स करण्यात आली आहे. येत्या २४ तारखेला आमदार संतोष बांगर कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
संतोष बांगर हे सध्या शिवसेना शिंदे गटात आहेत. शिवसेनेते फूट पडल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला होता. ते सातत्याने त्यांच्या वेगवेगळ्या वक्त्व्यांमुळे चर्चेत असतात. अशातच आता त्यांनी बाहेरगावच्या मतदारांना आणण्यासाठी फोन पे करण्याची भाषा केली आहे. त्यामुळे सर्वत्र त्यांच्या या वक्तव्याची चर्चा होत आहे. मतदारांना अमिष दाखवण्याचा हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.