रांची : महाराष्ट्रासोबत झारखंड विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. दरम्यान, झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या मित्रपक्षांमध्ये जागावाटप निश्चित झाले आहे. झारखंडच्या ८१ विधानसभा जागांपैकी जेएमएम आणि काँग्रेस ७० जागांवर निवडणूक लढवणार आहे. याशिवाय उर्वरित जागांवर आरजेडी, सीपीएम माले आणि इतर मित्र पक्ष निवडणूक लढवतील, असे मीडियाशी संवाद साधताना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सांगितले.
याचबरोबर, या जागांवर कोण आणि कुठे निवडणूक लढवेल हेही निश्चित केले जाईल. दरम्यान, जेएमएम आणि काँग्रेस किती जागा लढवणार हे मुख्यमंर्त्यांनी अद्याप जाहीर केलेले नाही. जेएमएम कार्याध्यक्ष आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी काँग्रेसचे झारखंड प्रभारी गुलाम अहमद मीर यांच्या उपस्थितीत जागावाटपाची घोषणा केली. मात्र, यावेळी राजद आणि डाव्या पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते. तसेच, इंडिया आघाडीत समाविष्ट असलेल्या मित्रपक्षांच्या नेत्यांशी सध्या चर्चा सुरू असल्याचे मुख्यमंर्त्यांनी सांगितले. आरजेडी आणि सीपीआयएलशी चर्चेनंतर हे देखील स्पष्ट होईल की, काँग्रेस आणि जेएमएम कोणत्या जागांवर लढतील, असे हेमंत सोरेन म्हणाले.
झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी १३ आणि २० नोव्हेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. तर झारखंडमध्ये एनडीएने आधीच जागा वाटून घेतल्या आहेत. राज्यातील ८१ जागांपैकी भाजप ६८ जागांवर, आजसू १० जागांवर आणि जेडीयू २ आणि लोजपा (रामविलास) एका जागेवर लढणार आहे. दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जेएमएमने ४३ जागांवर तर काँग्रेसने ३१ जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी जेएमएमने ३० तर काँग्रेसने १६ जागा जिंकल्या होत्या. तर सात जागांवर निवडणूक लढवणा-या राजदला केवळ एक जागा जिंकता आली होती.