सेलू : पूर्वजांचा इतिहास जाणून घेतल्याने मनाची घडण होते. अंगात सामर्थ्य संचारते. आपल्या घरण्याविषयी अभिमान वाटू लागतो. त्यामुळे पूर्वजांच्या गौरवशाली इतिहासाचे चिरंतन स्मरण ठेवा कारण ते प्रेरणादायी असते, असा संदेश अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष, राष्ट्रसंत स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी दिला.
सेलू शहरातील नूतन विद्यालयाच्या मैदानावर हनुमानगढ परिसरात सुरू असलेल्या श्रीराम कथेमध्ये शुक्रवार, दि.१८ रोजी राष्ट्रसंत गोविंददेव गिरीजी महाराज बोलत होते. शुक्रवारी रामकथेसाठी जगन्नाथधामचा देखणा मंच उभारण्यात आला होता. पुढे स्वामीजी म्हणाले की, आयुष्य नश्वर आहे. त्यामुळे योग्य ध्येय निश्चित केले पाहिजे. ज्यांची मन घडतात त्यांच्याकडून महान कार्य सिद्धीस जातात.
स्वत:तील आत्मविश्वास जागवा. स्वत: चूक करू नका पण, ज्यांच्याकडून चूक घडली त्यांच्याविषयी अंत:करणात करूणा असू द्या. आपले मन, मेंदू, मनगट मजबूत करा आणि जीवनामध्ये आपण काय कार्य करायला जन्मलोत हे समजून घ्या. तरच आपले जीवन सुखी, समृद्ध आणि सुंदर होईल असेही ते म्हणाले.
या वेळी विविध मान्यवरांसह ग्रामीण भागात संत तुकाराम गुरूकुलच्या माध्यमातून निवासी शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिल्याबद्दल रामकिशन आबा सोळंके व सौ.सोळंके (लिखित पिंपरी ता.परतूर) यांचा स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रा.संजय पिंपळगावकर, अशोक लिंबेकर यांनी सूत्रसंचालन केले. शहरात सुरू असलेल्या या रामकथेला श्रोत्यांची मोठी उपस्थिती होती.