कोल्हापूर : ‘मंत्री छगन भुजबळ यांनी संयम बाळगला पाहिजे. त्यांच्या विधानांमुळे मंत्रिमंडळात एकवाक्यता नाही, असा समज पसरतो. त्यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर पडावे; अन्यथा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याबाबत वेगळा विचार केला पाहिजे. समाजात जातीय तेढ निर्माण होईल, अशी विधाने कोणीच करू नयेत,’ असे स्पष्ट मत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी येथे व्यक्त केले.
श्री अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी ते कोल्हापुरात आले होते. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज्यात मराठा आरक्षणावरून ओबीसी आणि मराठा समाजातील आंदोलकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
यामध्ये मंत्री भुजबळ टीकाटिप्पणी करत आहेत.
याबद्दल मंत्री विखे-पाटील म्हणाले, ‘मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने आरक्षण देण्याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा आणि ओबीसी यांच्यातील वाद निरर्थक आहे. भुजबळ यांनी संयम बाळगणे हिताचे आहे. आज त्यांच्याबद्दल समाजात आदर आहे; मात्र त्यांच्या विधानांमुळे तो राहाणार नाही. त्यांच्या विधानांमुळे सरकारमध्ये एकवाक्यता नाही, असा संदेश समाजात जातो.
त्यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडावे; मग अशा प्रकारची विधाने करावीत. भुजबळ यांच्याविषयी मुख्यमंत्री आणि सरकारने वेगळा विचार केला पाहिजे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे करून आंदोलन करणे योग्य नाही. राज्यात जातीय तेढ निर्माण होईल, अशी विधाने कोणीही करू नयेत.’