नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी
महायुतीच्या जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या खलबतखान्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची गृहमंत्री अमित शहा यांनी मनधरणी केली, त्यानुसार राष्ट्रवादीच्या वाट्याला भलेही त्यांच्या अपेक्षापेक्षाही कमी जागा येतील मात्र राजकीय पुनर्वसनाच्या अनुषंगाने अन्य महत्वाचे लाभ त्यांना मिळणार आहेत. अजित पवार यांनी ६० जागांचा आग्रह धरला मात्र त्यांना ७ जागांवर तडजोड करावी लागत आहे. राष्ट्रवादीला एकंदर ५३ जागा मिळू शकतात.
याशिवाय अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना बाजूला सारून अमित शहा यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी स्वतंत्र खलबते केली. या बैठकीत मराठा- ओबीसी आरक्षणाचा तिढा, त्या अनुषंगाने उमेदवारांची चाचपणी या मुद्यांवर त्यांनी भर दिला असण्याची तसेच विधानसभा निवडणुकीत कोणताही दगाफटका टाळण्याच्या हेतूने शिंदे यांना अपेक्षित बळ देण्याच्या अनुषंगाने ही स्वतंत्र बैठक झाली अशी चर्चा आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपापल्या परीनं उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. पण सध्या दोन्ही आघाड्यांकडून जागावाटपाचा तिढा सोडवण्याचं काम सुरू आहे. अशातच केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी महायुतीतील नेत्यांची अडीच तास एकत्र महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यात जागावाटपाचा तिढा सोडवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
दिल्लीत अमित शहांसोबत पार पडलेल्या बैठकीत जास्तीत जास्त जागांचा आग्रह धरलेल्या अजित पवारांनी आपल्या आग्रह सोडावा यासाठी त्यांची मनधरणी करण्यात आली. अन्य राजकीय पुनर्वसनात जास्तीचा लाभ देण्याचं अजित पवारांना आश्वासन देण्यात आलं आहे. येत्या दोन दिवसांत महायुतीचे नेते एकत्र येऊन पत्रकार परिषद घेऊन जागावाटप जाहीर करणार आहेत.