27.7 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्र‘तुतारी’ की वाजणार पिपाणी?

‘तुतारी’ की वाजणार पिपाणी?

नवीन पक्षामुळे शरद पवार गटाच्या डोक्याला ताप

पुणे : प्रत्येक पक्षाची ओळख म्हणजे त्यांचे चिन्ह असते. निवडणुकीत या चिन्हांमुळे संभ्रम झाल्यास भल्या भल्या उमेदवारांना पराभवाचा झटका बसतो. तर पक्षाला मोठा खड्डा पडतो. लोकसभेत ‘तुतारी’ला ‘पिपाणी’ने अस्मान दाखवले होते. राष्ट्रवादी शरद पवार गटाला काही जागांवर नुकसान सहन करावे लागले होते. पुन्हा एकदा विधानसभेत या चिन्हांचा ताप शरद पवारांच्या पक्षाच्या डोक्याला राहणार आहे. आता या नवीन पक्षामुळे सुद्धा शरद पवार गटाला विधानसभेत सजग राहावे लागणार आहे.

दरम्यान, येत्या २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या परीने आपल्या पक्षाचा प्रचर करत आहे. परंतु पक्षाचा वारसा सांगणारे चिन्हच किती ताप देऊ शकतात हे लोकसभा निवडणुकीत दिसून आले. शरद पवार गटाविरोधात या चिन्हाने निर्णायक कामगिरी बजावली. दोन निवडणूक चिन्हांतील काही साम्यामुळे उमेदवारांना फटका बसला. मतांच्या काही फरकाने उमेदवार पडला. ‘तुतारी’समोर लोकसभेत ‘पिपाणी’ चिन्हाने मोठे आव्हान उभे केले. त्याविरोधात शरद पवार गटाने आगपाखड केली.

निवडणूक आयोगाने विनंती केली अमान्य
लोकसभा निवडणुकीत उमेदवार पडण्यामागे पिपाणीच कारणीभूत असल्याचे लक्षात आल्यावर शरद पवार गटाने हे चिन्ह गोठवण्यासाठी, पिपाणी चिन्ह हटवण्याची विनंती केंद्रीय निवडणूक आयोगाला केली होती. आयोगाने ही विनंती अमान्य केली. ‘तुतारी’ वाजवणारा माणूस आणि ‘पिपाणी’ हे चिन्हं वेगळी दिसतात. हा फरक मतदारांच्या सहज लक्षात येण्याजोगा असल्याचा दावा आयोगाने केला आहे.

या मतदारसंघात ‘पिपाणी’ला पसंती
लोकसभा मतदारसंघात पिपाणीचा तुतारीला फटका बसल्याचे समोर आले. चिन्ह साधर्म्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला. अनेक मतदारांनी ‘तुतारी’ ऐवजी ‘पिपाणी’ला भरभरून मतदान केले, ते संभ्रमामुळे केल्याचा दावा शरद पवार गटाने केला. शिरूर, बारामती, सातारा, भिवंडी, दिंडोरी, रावेर, अहिल्यानगर, बीड या मतदारसंघात पिपाणीला पसंती मिळाल्याचे दिसून आले.

न्यू राष्ट्रीय समाज पक्षाच्या हाती पिपाणी
आता न्यू राष्ट्रीय समाज पक्ष पिपाणी घेऊन निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर येत आहे. सरचिटणीस रामचंद्र घुटुकडे यांनी पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. आपल्या सर्व उमेदवारांसाठी ‘पिपाणी’ हे चिन्ह ‘न्यू राष्ट्रीय समाज’ पक्ष घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शरद पवार गटासह महादेव जानकर यांच्याही अडचणी वाढणार असल्याचे दिसते. ‘न्यू राष्ट्रीय’ समाज पक्षाचा झेंडा ही राष्ट्रीय समाज पक्षासारखाच असल्याने महादेव जानकर यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. ‘पिपाणी’ चिन्हाचा आग्रह धरला जाणार असल्याने लोकसभेनंतर विधानसभेलाही शरद पवार गटाला पिपाणी पुन्हा अडचणीत आणणार असल्याची चर्चा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR