विधानसभा निवडणुकीची लगीनघाई सुरू झाली आहे. मुहूर्तही ठरला आहे परंतु प्रमुख पक्ष अजूनही योग्य वराच्या शोधात आहेत. प्रत्येक जागेसाठी अनेक वर, उपवर इच्छुक आहेत. त्यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याने युती-आघाड्यांची गोची होत आहे. त्यातूनच महायुतीत तिढा, ‘मविआ’त ठिणगी अशा बातम्या येत आहेत आणि त्यावर प्रसारमाध्यमांची गुजराण होत आहे. युतीत तिढा निर्माण झाला, आघाडीत ठिणगी पडली तरी हे प्रकार सार्वजनिक का केले जातात? निर्माण झालेले प्रश्न आपापसात का सोडवले जात नाहीत हे न उलगडणारे कोडे आहे. महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा जवळपास सुटल्याचे गुरुवारी ‘मविआ’ने वाजतगाजत जाहीर केले होते. त्यानंतर शुक्रवारी ‘मविआ’मध्ये ठिणगी उडाल्याने विधानसभा निवडणुकीला आता खरी रंगत येऊ लागल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसने शिवसेनेच्या काही जागांवर दावा केल्याने उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेत महाराष्ट्र काँग्रेस जागावाटपाबाबत सक्षम नसल्याचे वक्तव्य केले अन् त्यावरून राऊत-पटोले यांच्यात चांगलीच जुंपली. दोघांतील वाद मिटवण्यासाठी काँगे्रसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांना मुंबईत यावे लागले. त्यांनी ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि वादावर पडदा पडला.
आघाडीची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले. एक-दोन दिवसांत जागावाटपही पूर्ण होईल असेही म्हणाले. महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आल्याचे सांगितले जाते. त्यानुसार भाजपला १५० ते १५५, शिंदे गटाला ७५-८० तर अजित पवार गटाला ५० ते ५५ जागा मिळणार आहेत म्हणे. विधानसभा निवडणुकीत विजयी वाटचाल करण्याच्या दृष्टीने महायुतीने रणनीती आखली असून त्यादृष्टीने मोर्चेबांधणी करण्यात आल्याचे सांगितले जाते. महायुतीत जागावाटपाबाबत कुठलाही वाद नाही, जागावाटपावर योग्य चर्चा सुरू आहे असे सांगण्यात आले. याचा अर्थच निश्चितपणे वाद आहे. जागावाटपावर महायुतीची सकारात्मक चर्चा सुरू असून चर्चा अंतिम टप्प्यात आहे. ३०-३५ जागांवर निर्णय बाकी आहे, तोही लवकरच होईल. राज्यात तो निर्णय सुटला नाही तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीत त्यावर तोडगा निघेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. अमित शहा हे शह-काटशहासाठी प्रसिद्ध आहेत.
नुकतेच त्यांनी एकनाथ शिंदे यांना सूचना वजा दमबाजी केली होती. त्यावरून महायुतीत रण माजले होते. चार दिवसांपूर्वी ‘आता तुम्ही त्याग करा’ असा इशारा गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री शिंदेंना दिला होता. एकनाथ शिंदेंना ही भाषा समजली असेलच. लोकसभा निवडणुकीत मतांची जास्त टक्केवारी राखणा-या शिंदेंना विधानसभेसाठी झुकते माप द्यावे लागणार हे लक्षात आल्याने भाजपने शिवसेनेला भावनिक आवाहन करून जास्त जागा बळकावण्याची खेळी केली आहे. लोकसभा निवडणुकीत अजिबात छाप न पाडू शकलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला तडजोड करायला लावण्याऐवजी एकनाथ शिंदेंना बळीचा बकरा बनवले जात आहे. हरियाणातील यशाने भाजप हुरळून गेली आहे. परंतु ‘वापरा आणि टाकून द्या’ हे प्रत्येक वेळी यशस्वी होऊ शकत नाही, हे भाजपने लक्षात घ्यायला हवे. विधानसभेचे रणशिंग फुंकले गेल्यानंतर सर्वच पक्षांची सर्वाधिक जागा मिळवण्यासाठी धडपड सुरू झाली.
लोकसभेत भाजपपेक्षा चांगला ‘स्ट्राईक रेट’ राखल्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचा भाव वधारला. मात्र सरकार स्थापन करताना आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करून खूप मोठा त्याग केला, आता तुम्ही त्याग करा असा सूचक इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना दिला. या देशात पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि राज्यपाल ही तीनच पदे महत्त्वाची आहेत. बाकी गृहमंत्र्यांसह सर्व पदे फक्त व्यवस्थेसाठी आहेत. काम पूर्ण होण्यासाठी केलेली ती व्यवस्था आहे. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रिपद दिले. तुमच्यासाठी आमच्या माणसांना त्याग करावा लागला. त्यामुळे जागावाटपात मित्रपक्षांना झुकते माप द्या, असे अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले होते. म्हणजेच सत्तेच्या सारीपाटात भाजपने हळूहळू पत्ते उघडण्यास सुरुवात केली. अमित शहा यांचीच री ओढताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनी मोठ्या मनाने त्याग करावा असा सल्ला दिला.
एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यात काय बोलणे झाले ते मला माहीत नाही (मग बोलता कशाला?) मात्र, उद्धव ठाकरे युती तोडून आघाडीत गेल्यानंतर मोठे मन करून शिंदे आमच्याकडे आले. अजित दादाही त्रासाला कंटाळून आले, त्यांचाही त्याग आहे, आमचाही त्याग आहे असे बावनकुळे म्हणाले. त्याला उत्तर देताना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले म्हणाले, भाजपने जसा त्याग केला, तसा आम्ही देखील केला. किंबहुना आम्ही केलेल्या त्यागामुळेच आम्हाला मुख्यमंत्रिपद मिळाले. राज्यात महायुतीची सत्ता आली. प्रत्येकाची भूमिका योग्य आहे. राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आणायची असेल तर सर्वांना मिळूनमिसळून काम करावे लागेल -इति महामंडळ बोलता है! मजेची गोष्ट म्हणजे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे कर्तव्यदक्ष गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, त्याग करा असे गृहमंत्री अमित शहा म्हणालेच नाहीत! महायुतीचा जागावाटपाचा गोंधळ अथवा घोळ एक महिन्यापासून सुरू होता. त्यामुळे जागावाटपाचा विषय मिटविण्यासाठी, अमित शहा यांनी एकनाथ शिंदे
यांच्यावर दबाव वाढवला.
‘तुम्हाला मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही मोठा त्याग केला’ अशा शब्दांत त्यांनी एकनाथरावांचे कान टोचले. खरे पाहता उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी शिवसेना फोडणे ही भाजपचीच गरज होती, एकनाथ शिंदे यांची नाही. आपल्या गरजेपोटी मुख्यमंत्रिपदाची लालच दाखवणे आवश्यक होते ते भाजपने केले. त्यात त्याग किंवा उपकार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. महाविकास आघाडीचा कारभार सुरळीत चालू असताना भाजपने फोडाफोडीचे राजकारण करून, अवैध मार्गाने सत्ता स्थापन केली, शिवाय अनेक भ्रष्ट नेत्यांना आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिले. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची भाजपची तयारी असते हे अनेकवेळा दिसून आले आहे. तसे नसते तर ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा ज्यांच्यावर आरोप होता ते अजित पवार मंत्रिमंडळात दिसलेच नसते! खोटे बोल पण रेटून बोल ही भाजपची रणनीती आहे.