लातूर : शहरासह जिल्ह्यातील विविध २३ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत शनिवारी रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन राबविले. यावेळी तब्बल ६१ सराईत गुन्हेगारांची पोलिसांकडून झाडाझडती घेण्यात आली. यामध्ये २६ कोयते, कत्ती, धारदार शस्त्र असा मुद्देमाल जप्त केला आहे. यासाठी जिल्ह्यातील विविध २८ ठिकाणी पोलिस पथकांनी नाकाबंदी केली आहे. पोलिसांनी अचानकपणे केलेल्या कारवाईत दडी मारून बसलेल्या अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. टवाळखोर, हातात शस्त्र घेऊन दहशत निर्माण करणा-या गुन्हेगारांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडली आहे.
पोलिसांनी सांगितले, गत आठवड्यात लातूरसह उदगीर आणि औशात झालेल्या खुनाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची शोधमोहीम हाती घेतली आहे. यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशानुसार लातूर शहरातील गांधी चौक, शिवाजीनगर, एमआयडीसी, विवेकानंद चौक आणि लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यासह जिल्ह्यातील एकूण २३ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अचानकपणे नाकाबंदी करण्यात आली. शनिवारी रात्री सुरू करण्यात आलेली कोम्बिंग ऑपरेशन रविवारी पहाटेपर्यंत सुरूच होती.
लातूरसह जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या रेकॉर्डवर असलेल्या सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यासाठी पोलिस पथकांनी अचानकपणे शोध मोहीम राबविली. यामध्ये एकूण ६१ सराईत गुन्हेगारांची झडती घेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
शनिवारी रात्री पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकूण २६ कोयते, धारदार शस्त्र आणि कत्तीसारखे हत्यार जप्त करण्यात आली आहेत. घरांची झडती घेतली असता, धारदार शस्त्रे आढळून आली आहेत. या गुन्हेगारांना ताब्यात घेत कसून चौकशी केली जात आहे. ही शस्त्रे कशासाठी आणि कोणत्या कारणासाठी बाळगली? याचीही चौकशी केली जात आहे.
वाहनांची झाडाझडती
लातूर जिल्हाभरात शनिवारी रात्रभर करण्यात आलेल्या नाकाबंदीत वाहनांची मोठ्या प्रमाणावर तपासणी करण्यात आली. यामध्ये दारू पिऊन वाहन चालविणा-या एकूण १७ चालकांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्यात आले असून, हे चालक दारूच्या नशेत वाहन चालविताना आढळून आले. ही कारवाई पुढेही सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.