27.7 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रभाजपच्या पहिल्या उमेदवार यादीची ५ वैशिट्ये!

भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीची ५ वैशिट्ये!

मुंबई : विशेष प्रतिनिधी
भाजपच्या पहिल्या यादीमध्ये विशेषत: विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली. ज्या आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे, त्यांना दुस-या यादीमध्ये ढकलण्यात आले आहे. ज्या ठिकाणी उमेदवार जाहीर बदलले जाणार नाहीत अशा ठिकाणी भाजपकडून पहिल्या यादीमध्ये उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. वादाच्या जागा आहेत त्याठिकाणी अजून उमेदवार जाहीर करणे भाजपने टाळले आहे. त्यामुळे जे उमेदवार बदलले जातील ते दुस-या यादीमध्ये असतील अशी चर्चा आहे.

तीन अपक्ष, नेत्यांची मुलंही मैदानात
भाजपच्या पहिल्या यादीमध्ये सख्ख्या भावांना तिकीट देण्यात आले. यामध्ये महेश बालदी यांचा सुद्धा समावेश आहे, अन्य दोन अपक्ष राजेश बकाने यांना देवळी, तर विनोद अग्रवाल यांना गोंदिया मतदारसंघातून संधी देण्यात आली असून नेत्यांची मुलंही मैदानात आहेत. घराणेशाहीवर सातत्याने बोलले जात असताना मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या भावाला मालाड पश्चिममधून उमेदवारी देण्यात आली आहे. वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार यांना संधी देण्यात आली आहे. भोकरमधून भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मराठवाड्यात १६ उमेदवार
विदर्भामधून सर्वाधिक कुणबी उमेदवार देण्यात आले आहेत, तर पश्चिम महाराष्ट्रात विदर्भामध्ये विद्यमान आमदारांना सर्वाधिक संधी देण्यात आली आहे. आरक्षणाच्या वादामुळे सर्वाधिक संवेदनशील झालेल्या मराठवाड्यामध्ये १६ उमेदवार देण्यात आले असून मराठा उमेदवारांना सर्वात जास्त प्राधान्य देत मनोज जरांगे पाटील यांच्या फॅक्टरचा प्रभाव कमी कसा करता येईल याकडे सुद्धा लक्ष देण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील गेवराईचे उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत.

मुंबईत पराभूतांनाही संधी
घाटकोपर पश्चिममधून राम कदम यांचा पत्ता कट केला जाईल अशी चर्चा होती. मात्र, त्यांना पहिल्या यादीमध्ये संधी देण्यात आली. मालाड पश्चिममधून विनोद शेलार यांना संधी देण्यात आली. विनोद आशिष शेलार यांचे बंधू आहेत. वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार यांना संधी देण्यात आली. लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या मिहीर कोटेचा यांना मुलुंड मतदारसंघातून संधी देण्यात आली, तर कुलाबामधून राहुल नार्वेकर यांना संधी देण्यात आली. मंगल प्रभात लोढा यांना मलबार हिल मतदारसंघातून संधी देण्यात आली. अंधेरी पश्चिममधून अमित साटम यांना संधी देण्यात आली.

विद्यमान आमदार रिंगणात
पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपकडून विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली. मात्र चिंचवडमधून मनीषा जगताप यांच्या ऐवजी शंकर जगताप यांना उमेदवारी देण्यात आली. कोथरूडमधून पुन्हा एकदा चंद्रकांत दादा पाटील उमेदवारीच्या रिंगणात असणार आहेत. कराड दक्षिणमधून डॉ. अतुल भोसले यांना पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली. सातारमधून छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली. कोल्हापूर दक्षिणमध्ये अमल महाडिक यांना संधी देण्यात आली आहे. इचलकरंजीमध्ये नुकताच पक्ष प्रवेश केलेल्या राहुल आवाडे यांना उमेदवारी देण्यात मिळाली. सांगली जिल्ह्यातील दोन ठिकाणी विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. मिरजमधून सुरेश खाडे यांना, तर सांगलीमधून सुधीर गाडगीळ यांना उमेदवारी देण्यात आली.

शिंदेसेनेच्या जागा भाजपकडे
भाजपने पाच मतदारसंघ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून खेचून घेतले आहेत. धुळे शहर, अचलपूर, देवळी, नालासोपारा, उरण हे मतदारसंघ शिवसेनेचे होते. पण आता या मतदारसंघात भाजपने त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिल्यानंतर विधानसभा निवडणुकांसाठी तुम्ही त्याग करा, असे अमित शाह यांनी म्हटले होते. त्यातच आता शिवसेनेच्या पाच जागांवर भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. या समीकरणाचा पालघर आणि बोईसरच्या जागांवरही परिणाम होणार असल्याचे म्हटले जाते.

३ आमदारांची वाढली धाकधूक
भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील ३ ठिकाणच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये अक्कलकोटमधून सचिन कल्याणशेट्टी, सोलापूर उत्तर मधून विजयकुमार देशमुख, सोलापूर दक्षिणमधून सुभाष देशमुख यांना पुन्हा संधी देण्यात आली. मात्र पंढरपूर, बार्शी आणि माळशिरसमध्ये भाजपने अद्याप उमेदवार जाहीर केले नाहीत. पंढरपूरमध्ये समाधान आवताडे हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. तर बार्शीत भाजप पुरुस्कृत राजेंद्र राऊत हे आमदार आहेत, त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच माळशिरसमध्ये राम सातपुते हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. या तिन्ही मतदारसंघात भाजपने उमेदवारांच्या नावाची घोषणा केली नाही. त्यामुळे या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR