मुंबई : राज्यात निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला ब्रेक लागला आहे. यादरम्यान आता लाडकी बहीण योजनेवरुन बँक कर्मचा-यांनी संपाचं हत्यार उपसले आहे. महाराष्ट्रात बँक कर्मचा-यांनी १६ नोव्हेंबर रोजी संपाची घोषणा केली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू झाल्यानंतर ती राबवताना सुरक्षित वातावरण मिळत नसल्याचे बँक कर्मचा-यांनी म्हटले आहे. तसेच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांकडून बँक कर्मचा-यांचा झालेला छळ आणि हल्ला यामुळे हे संपाचे हत्यार उचलण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने हा संप पुकारला आहे. यूएफबीयू ही नऊ बँक युनियनची संघटना आहे. यूएफबीयूचे राज्य समन्वयक देवीदास तुळजापूरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेमुळे बँकांमध्ये मोठा गोंधळ माजला आहे. सरकारकडून नियोजनाचा तसेच संवाद साधण्याचाही अभाव आहे. या योजनेमुळे बँक कर्मचा-यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.