इंदापूर : विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर इंदापूरमध्ये आमदार दत्तात्रय भरणे यांचा फोटो असलेल्या पिशव्यामधून तालुक्यांमध्ये साड्यांचे वाटप करण्यात आलं होतं. त्यानंतर महिलांनी या साड्या अक्षरश: रस्त्यावर फेकून दिल्या होत्या. शिवाय साड्या देऊन आमची मतं विकत घेता का? असा सवाल करत महिलांनी आक्रोशही व्यक्त केला. इंदापूर तालुक्यातील कळंब या गावातील घोडके वस्तीवरील महिलांनी या साड्या फेकून दिल्याचा होत्या.
गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री दत्तात्रय भरणे इंदापूर तालुक्यात पैठणीच्या खेळाच्या माध्यमातून साड्या वाटप करतात, असा आरोप करण्यात येत होता. आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आचरसंहितेचा भंग केल्याचा आरोप करत निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली आहे.
गेल्या काही दिवसापासून इंदापूर तालुक्यात खेळ पैठणीच्या माध्यमातून भरणे साड्या वाटप करीत असल्याचा आरोप केला जातोय. दरम्यान, आता यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीने देखील उडी घेतलीये. आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
आम्हाला तुमच्या साड्या नको आम्हाला आमच्या परिसरातील विकास हवा आहे. रस्ते लाईट व आमच्या युवकांना हाताला काम पाहिजे, असं म्हणत इंदापूर तालुक्यातील कळंब – वालचंदनगर परिसरातील घोडके वस्ती येथील महिलांनी चक्क इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा फोटो असलेल्या साड्या रस्त्यावर फेकून दिल्यात. या साड्यांच्या पॅंिकगवर आमदार भरणे यांचा भला मोठा फोटो असून त्यावर आपला माणूस असं लिहण्यात आलं आहे. त्यामुळे मतदारांना साड्यांचं प्रलोभण दाखवण्यात आल्याची जोरदार चर्चा रंगलीय. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होतोय. यानंतर आचारसंहिता काळात या साड्या वाटल्या, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी केलाय. निवडणूक आयोगाला पत्र लिहून महारुद्र पाटील यांनी कारवाई करण्यासंदर्भात तक्रार केली आहे.