पुणे : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष हा विचारांवर चालणारा पक्ष असल्याचा दावा केला जातो. भाजपच्या त्यांच्या काही विचारधारा असून काही परंपरांना त्यांचा तीव्र विरोध आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ९९ उमेदवार घोषित केले आहेत. यामध्ये बहुतांशी उमेदवार विद्यमान आहेत तर काही नवीन चेह-यांचे राजकारणाशी कौटुंबिक संबंध आहेत. आधी घराणेशाहीला विरोध करणा-या भाजपमध्ये आता सर्रास राजकीय घराणेशाही परंपरा सुरू झाली आहे.
दरम्यान, भाजपला केंद्रामध्ये सत्तेवर येऊन तब्बल तीन टर्म झाली आहेत. मागील अनेक वर्षे भाजप राज्यामध्ये देखील सत्तेवर आहे. उद्धव ठाकरेंच्या मंत्रिपदाचा कार्यकाळ सोडला तर भाजप २०१४ नंतर सत्तेवर आहेच. केंद्रासह आता राज्यामध्ये भाजपमध्ये राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांना किंवा जवळच्या व्यक्तींना उमेदवारी देण्यास सुरुवात झाली आहे.
आधी काँग्रेस सरकारच्या काळामध्ये भाजपकडून घराणेशाहीच्या मुद्यावर जोरदार टीकास्त्र डागण्यात आले. राजकारणातील घराणेशाही संपवण्यासाठी भाजप आहे, असे देखील भाजपकडून सांगण्यात येत होते. आता मात्र महाराष्ट्रामध्ये भाजपने घराणेशाहीची परंपरा सुरू केल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या पहिल्याच यादीमध्ये अशा कौटुंबिक चेह-यांना संधी देण्यात आली आहे.
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे यांना उमेदवारी देण्यता आली आहे. माजी आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते आणि गणपत गायकवाड यांची पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे, पक्षाचे नेते धनंजय महाडिक यांचे बंधू अमल महाडिक, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांचे नातून संभाजी पाटील निलंगेकर आणि माजी खासदार अनिल शिरोळे यांचे चिरंजीव सिद्धार्थ शिरोळे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यपाल हरिभाऊ जावळे यांच्या कुटुंबात अमोल जावळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
श्रीजया अशोक चव्हाण
भाजपकडून पहिल्या यादीमध्ये भोकर विधानसभा मतदारसंघातून श्रीजया चव्हाण यांना संधी देण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेशानंतर लगेचच त्यांना राज्यसभेची खासदारी देण्यात आली. राज्यामध्ये राजकारण करणा-या अशोक चव्हाण यांच्या मुलीला श्रीजया अशोक चव्हाण यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
शंकर जगताप
भाजपकडून पिंपरी-चिंचवड मतदारसंघासाठी दिवंगत नेते लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. यावेळी जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना संधी देण्यात आली आहे.
विनोद शेलार
भाजपचे आशिष शेलार यांना वांद्रे पश्चिम या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्याचबरोबर आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांना भाजपकडून मालाड पश्चिम या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे.
राहुल प्रकाश आवाडे
इचलकरंजीमध्ये विद्यमान प्रकाश आवाडे हे अपक्ष आणि भाजप सहयोगी आमदार आहेत. आता आवाडे यांच्या मुलाला भाजपने इलचकरंजीमध्ये उमेदवारी जाहीर केली आहे. राहुल प्रकाश आवाडे यांना इचलकरंजीमधून भाजपने पहिल्या यादीमध्ये उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आधी भाजपमध्ये तीव्र विरोध असलेल्या घराणेशाही पायमुळे भाजपमध्ये फुटली आहेत, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.