24.9 C
Latur
Wednesday, November 27, 2024
Homeपरभणीहवामान बदलाचा सामना करण्यासाठी बियाणे वितरण

हवामान बदलाचा सामना करण्यासाठी बियाणे वितरण

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन केंद्राच्या हवामान बदलानुरूप राष्ट्रीय कृषि उपक्रमअंतर्गत रबी हंगामाचे नियोजन आणि चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात उजळांबा, बाभुळगाव व सोन्ना या गावांतील एकूण ३८ शेतक-यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी विद्यापीठाने विकसित केलेली करडईची पीबीएनएस-८६ (पूर्णा),ज्वारीची परभणी सुपरमोती (एसपीव्ही २४०७) आणि हरभ-याची फुले विक्रम ही सुधारीत बियाणे प्रात्यक्षिकासाठी शेतक-यांना वितरीत करण्यात आली. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी या सुधारीत वाणांचा प्रचार व प्रसार करण्याचा हेतू या कार्यक्रमामागे होता.

मुख्य शास्त्रज्ञ डॉ. वा. नि. नारखेडे यांनी शेतक-यांना मार्गदर्शन करताना सोयाबीन काढणीनंतर लगेचच रब्बी पिकांची लागवड करण्याचे महत्त्व सांगितले. विद्यापीठाने विकसित केलेल्या वाणांचा वापर आणि आंतरपीक पद्धतीचा अवलंब करण्याचे मार्गदर्शन त्यांनी केले. रब्बी हंगामात हरभरा + करडई (४:२) आणि रब्बी ज्वारी + हरभरा (२:४) अशा आंतरपीक पद्धतींचा उपयोग शेतक-यांना फायदेशीर ठरेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. अ‍े. के. गोरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ (कृषिविद्या) यांनी उपस्थित शेतक-यांना आधुनिक सिंचन पद्धतींच्या वापराबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी ठिबक सिंचन व तुषार सिंचन यासारख्या पद्धतींचा वापर करून पिकांना योग्य वेळी पाणी देण्याचे महत्त्व पटवून दिले. तसेच बीज प्रक्रिया, पीक संरक्षण आणि वेळेवर लागवड यांसारख्या पंचसुत्री पद्धतींच्या अवलंबावर भर दिला. मृदशास्त्रज्ञ डॉ. पी. एच. गौरखेडे यांनी तेलबिया आणि दाळवर्गीय पिकांमध्ये स्फुरद व गंधकयुक्त खतांचा वापर करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना डॉ. अ‍े. के. गोरे यांनी केली. शेतकरी ज्ञानोबा धोतरे, शिवाजी दळवे, कृष्णा धोतरे, प्रभाकर धोतरे, आवडाजी गमे तसेच बाभुळगाव, उजळांबा व सोन्ना येथील उपस्थित शेतक-यांनी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून मिळालेल्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. यशस्वितेसाठी प्रा. आर. एस. राऊत, एस. पी. काळे, एम. ए. राऊत, व्ही.जे. रिठ्ठे, सादेक शेख, कालीदास खटींग, वसंत जाधव, दिपक भुमरे, प्रदीप मोरे यांनी योगदान दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR