लातूर : प्रतिनिधी
देशभरात दि. १ सप्टेंबर २०२३ ते दि. ३१ ऑगस्ट २०२४ या कालावधीत वीरगती प्राप्त २१६ पोलीस अधिकारी अंमलदार यांना लातूर पोलिस मुख्यालयात लातूर जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस मुख्यालयाच्या परिसरात असलेल्या शहीद स्मारक येथे दि. २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता मानवंदना देण्यात आली.
लडाखमधील भारतीय सीमेवरील बर्फाच्छादीत व निर्जन अशा हॉटस्प्रिंग या ठिकाणी भारताचे १० पोलीस जवान गस्त घालत असताना २१ ऑक्टोंबर १९५९ रोजी अचानक दवा धरुन बसलेल्या चिनी सैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्या हल्ल्याला शेवटपर्यंत चोख प्रत्युत्तर दिले. दि. १ सप्टेंबर २०२३ ते ३१ ऑगस्ट २०२४ या कालावधीत भारताच्या विविध राज्यामधील पोलीस ठाणे तसेच विशेष पथकांमध्ये कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या २१६ वंदनीय वीर पोलीस अधिकारी व अंमलदार यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वीर जवानांनी आपल्या देशाच्या सीमेची रक्षण करताना दाखविलेल्या या उच्च कोटीच्या शौर्याची गाथा इतरांना कळावी तसेच राष्ट्रनिष्ठा, कर्तव्य निष्ठ भावनेची ज्योती प्रत्येकाच्या मनात तेवत राहावी म्हणून शहीद पोलीस जवानांच्या स्मृतिप्रित्यर्थ दि. २१ ऑक्टोंबर हा दिवस संपूर्ण भारतभर पोलीस स्मृतिदिन म्हणून पाळला जातो.
या स्मृती दिन मानवंदनेसाठी प्रमुख व जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, पोलीस उप अधीक्षक गजानन भातलवंडे उपस्थित होते. सर्व पोलीस अधिकारी अमलदारांनी स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन सलामीसह मानवंदना दिली. यावेळी राखीव पोलीस निरीक्षक गफार शेख यांच्या नेतृत्वाखालील प्लाटूनने सलामी व शोक शस्त्र करुन हवेमध्ये गोळ्यांंच्या तीन फैरी झाडून शहिदांना मानवंदना दिली. सूत्रसंचालन व शहिदांचे नाव वाचन सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद पाटील व महिला पोलीस उपनिरीक्षक हिना शेख यांनी केले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील ४५ पोलीस अधिकारी व ३५० पोलीस अंमलदार उपस्थित होते.