लातूर : विशेष प्रतिनिधी
महाविकास आघाडीचे जागा वाटप निश्चित झाले नाही. महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावरुन वाद सुरु आहे. अनेक बैठकांमध्ये अजून शिवसेना आणि काँग्रेसमधील वाद मिटला नाही. त्यातच शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांच्यासमोर नवीन अडचण निर्माण झाली आहे. शिवसेनेच्या सोबतीला असलेल्या संभाजी ब्रिगेडने जागांची मागणी केली आहे. यामुळे पक्षातील दावेदार, काँग्रेस आणि आता संभाजी ब्रिगेड अशा तिहेरी धर्मसंकटात उद्धव ठाकरे सापडले आहेत.
शिवसेना उबाठा आणि संभाजी ब्रिगेड यांची युती आहे. आता या युतीचा वाटा संभाजी ब्रिगेड मागत आहे. संभाजी ब्रिगेडकडून उद्धव ठाकरे यांच्याकडे पाच जागांची मागणी करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेड चिखली, हिंगोली व नांदेड उत्तरच्या जागेसाठी आग्रही आहे. चिखलीतून पुरुषोत्तम खेडेकर यांच्या पत्नी माजी आमदार रेखाताई खेडेकर, हिंगोलीतून संभाजी ब्रिगेडचे राज्य अध्यक्ष अध्यक्ष मनोज आखरे इच्छूक आहेत.
नांदेड उत्तरमधून मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांना उमेदवारी हवी आहे. त्यासाठी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज ठाकरे, गंगाधर बनबरे व सौरभ खेडेकर मुंबईत ठाण मांडून आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत संभाजी ब्रिगेडची युती आहे. नांदेड उत्तरच्या जागेसाठी ठाकरे गटाचे पदाधिकारी ही मुंबईतच बसून आहेत.
शिरूर-हवेली, मुंबईत ठाकरेंना धक्का
दरम्यान, शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष इच्छूक उमेदवार माऊली कटके यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ही बाब शिरूर लोकसभेत उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का मानली जात आहे. आता माऊली कटके यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय मुंबईतील ६ मतदार संघात दोन-दोन इच्छूकांनी दावा केल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या डोकेदुखीत आणखी भर पडली आहे.