मुंबई : विशेष प्रतिनिधी
शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट झाल्याचे वृत्त समोर येताच एकच खळबळ उडाली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत जागावाटपावरुन वाद सुरु असताना ही बातमी आली. काँग्रेसच्या सुत्रांच्या हवाल्याने ही बातमी देण्यात आली असली तरी आता त्यामागील मुख्य सूत्रधाराची माहिती समोर आलेली आहे.
‘मविआ’त बेबनाव पेरण्याचा हेतू
दोन मोठे नेते भेटल्याची बातमी कोणी पेरली, ती कशासाठी पेरली गेली, याबद्दल ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट केली आहे. फडणवीस-ठाकरेंची भेट झाल्याचा दावा काही दिवसांपूर्वी वंचितकडून करण्यात आला होता. आता असंच वृत्त काँग्रेस सुत्रांच्या हवाल्याने देण्यात आले. त्यातून सर्वात मोठ्या पक्षाने बरेच डाव साधले. ठाकरे सेनेकडे धोरण नाही. ते बेभरवशी आहेत. सत्तेसाठी कोणासोबतही जाऊ शकतात, असा एक मेसेज या बातमीतून देण्यात आला. महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमध्ये बेबनाव निर्माण करण्याच्या हेतूने बातमी पेरण्यात आल्याचे सूर्यवंशी यांनी म्हटले.
ठाकरेंना ‘डॅमेज’ करण्याचा कट
ठाकरे-फडणवीस यांच्या भेटीची बातमी पेरण्याचा उद्देश महाविकास आघाडीसह ठाकरेंना डॅमेज करणे हा होता. ठाकरेसेनेबद्दल अविश्वास निर्माण करण्याच्या हेतूने बातमी पेरली गेली होती. ठाकरे काहीही करु शकतात. कोणासोबतही जाऊ शकतात. त्यांची वृत्ती धरसोडीची असल्याचा मेसेज या बातमीतून गेला. जनमानसात असा संदेश गेल्यास विधानसभा निवडणुकीत ठाकरे सेनेला फटका बसेल. त्याचा थेट फायदा महायुतीला होईल.
एकनाथ शिंदेंना सूचक इशारा
गुप्त भेटीच्या बातमीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देखील मेसेज देण्यात आला. लोकसभा निवडणुकीत श्ािंदेंनी बरीच रस्सीखेच करुन १५ जागा पदरात पाडून घेतल्या. यातील ७ जागांवर त्यांनी विजय मिळवला. त्यांचा स्ट्राईक रेट भाजपपेक्षा चांगला राहिला. आता त्याच कामगिरीचा दाखला देत श्ािंदेसेनेकडून १०० जागांची मागणी केली जात आहे. भाजपची श्ािंदेंना इतक्या जागा सोडण्याची तयारी नाही. त्यामुळे ठाकरे-फडणवीस भेटीची बातमी पेरुन भाजप आजही ठाकरेंच्या संपर्कात असल्याचा मेसेज शिंदेंना देण्यात आला. ‘आग को पानी का डर’ हे तत्त्व भाजपकडून वापरण्यात आले आणि अधिक जागा मागू नका, अन्यथा पर्याय आमच्याकडे आहे, असा सूचक संदेश देणारे राज या बातमीत दडलेले दिसले.