नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी
एकीकडे सत्ताधारी भाजपने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या ९९ उमेदवारांची घोषणा केली. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये अद्याप जागावाटपावर अंतिम तोडगा निघालेला नाही. दरम्यान, महाराष्ट्रामधील उमेदवार यादी जाहीर करण्यापूर्वी राज्यातील काँग्रेसचे नेते दिल्लीमधील हायकमांडसोबत काही महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करत आहेत. त्यामध्ये आमदारांविरोधात असलेली अँटी इन्कम्बन्सी आणि काही आमदारांनी घेतलेली पक्ष विरोधी भूमिका यांच्यावर विशेष चर्चा करण्यात आल्याचं वृत्त आहे.
काँग्रेसच्या १२ आमदारांविरोधात अँटी इन्कम्बन्सीचा प्रभाव दिसत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातही ७ जागांवर अँटी इन्कम्बन्सी अधिक परिणामकारक ठरण्याची चिन्हे आहेत. यापैकी काही जागांवर शिवसेना ठाकरे गटाकडून तर काही जागांवर शिवसेना श्ािंदे गटाकडून दावा ठोकला जात आहे. त्यामुळे जिथे काँग्रेसच्या आमदारांविरोधात अधिक अँटी इन्कम्बन्सी दिसत आहे, यापैकी काही जागांवर अदलाबदल होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या काही आमदारांनी विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याचा आरोप झाला होता. २०२२ मध्ये झालेल्या क्रॉस व्होटिंगमुळे चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव झाला होता. तर नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीतही काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याची चर्चा आहे. काँग्रेसच्या ७ आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा संशय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला होता. त्यापैकी झीशान सिद्धिकी, जितेश अंतापूरकर आणि हिरामण खोसकर यांनी पक्ष सोडला आहे. तर चार आमदार अजूनही काँग्रेसमध्ये आहेत. मात्र त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे.