21.4 C
Latur
Wednesday, October 23, 2024
Homeमहाराष्ट्र‘मनसे’च्या ४५ उमेदवारांच्या यादीतील ५ खासियत!

‘मनसे’च्या ४५ उमेदवारांच्या यादीतील ५ खासियत!

लातूर : निवडणूक डेस्क
‘मनसे’ने विधानसभा निवडणुकीसाठीची ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचंही नाव समाविष्ट आहे. यादीत जाहीर करण्यात आलेले मतदार संघ आणि उमेदवार पाहता काही गोष्टी प्रकर्षाने लक्षात येतात. पाहूया
‘मनसे’च्या यादीतील ५ खासियत…

प्रस्थापितांना आव्हान देणा-या चेह-यांची निवड
‘मनसे’च्या यादीत संदीप देशपांडे, अविनाश जाधव, नयन कदम, गजानन काळे, महेंद्र भानुशाली यांची नावं आहेत. त्यात शिवडीतून बाळा नांदगावकर यांच्या नावाचा यादीत समावेश नसला तरी राज यांनी याआधीच एका कार्यक्रमात त्यांच्या नावाची घोषणा केली होती. यादीत पहिल्या क्रमांकावर विद्यमान आमदार राजू पाटील यांच्या नावाचा समावेश केला. निष्ठावंतांसह मतदार संघांचा स्थानिक पातळीवर आढावा घेऊन ज्या ज्या मतदार संघांमध्ये प्रस्थापित उमेदवारांना आव्हान देऊ शकतील अशा चेह-यांना संधी दिलेली दिसून येते. यात खडकवासल्यात मनसेचे गोल्डनमॅन रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे, हडपसरमध्ये साईनाथ बाबर, कोथरुडमध्ये किशोर शिंदे, श्रीगोंदा संजय शेळके, आष्टी कैलास दरेकर अशा नावांचा समावेश दिसतो.

‘मनसे’ची भिस्त प्रामुख्याने शहरी मतदारांवर
मनसेच्या ४५ उमेदवारांच्या यादीतील मतदार संघ पाहिले तर जिथे मनसेला आजवर चांगलं मतदान झालं आहे अशा ठिकाणांचा समावेश आहे. म्हणजे मतदार संघातील मतांच्या गणिताचा कागदोपत्री अभ्यास पडद्यामागे झालेला दिसून येतो. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, शहापूर, जळगाव शहर, सोलापूर शहर अशा शहरी मतदार संघांवर मनसेची भिस्त दिसून येते. त्यामुळे हक्काची मत असलेल्या मतदार संघांचा या यादीत समावेश केला असे म्हणता येईल.

राजपुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या परिक्षेत
राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनीही निवडणुकीच्या रिंगणात दोन हात करण्याची दाखवलेली तयारीही सुचक दिसते. याआधी उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवली तेव्हाही वरळी मतदार संघ चर्चेच्या केंद्रस्थानी आला होता. पर्यायानं पक्षालाही एकप्रकारे बूस्टर मिळाला होता. आता मनसे एक पक्ष म्हणून या निवडणुकीकडे किती गांभीर्याने पाहतो हे अमित ठाकरे यांच्या उमेदवारीतून त्यांनी सिद्ध केलेले दिसते. अमित ठाकरेंच्या रुपानं विधानसभा निवडणुकीची मनसेची चर्चाही राहील आणि स्वत: ठाकरे कुटुंबातील सदस्य आता थेट परीक्षेला बसणार असल्यानं राज्यात कार्यकर्त्यांमध्येही निवडणुकीच्या गांभीर्याबाबत भक्कम संदेश जाईल. कार्यकर्ते जोमानं कामाला लागतील.

नाशिकमध्ये ‘मनसे’ची आयारामांना संधी
मनसेची दुसरी यादी आली तरी नाशिक जिल्ह्यातील एकाही मतदार संघाचा समावेश नाही हेही एक वैशिट्य म्हणावे लागेल. एकेकाळी नाशिक मनसेचा गड होता. मुंबईनंतर नाशिकमध्येच मनसेचा चांगला मतदार आहे. असं असतानाही नाशिक जिल्ह्यातील १५ मतदार संघांपैकी एकाही मतदार संघाचा यादीत समावेश नाही. त्यामुळे नाशिक जिल्ह्यावरील मनसेची पकड कमी होतेय का? की मनसे अजूनही नाशिकच्या बाबतीत वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे? असा सवाल उपस्थित होतो. मनसेचे नाशिकमधून २००९ मध्ये तीन आमदार निवडून आले होते. नाशिक महानगरपालिकेवर ४० नगरसेवकांसह मनसेनं सत्ता प्रस्थापित केली होती. नाशिकमध्ये मोजके चर्चेतील चेहरे वगळता तुल्यबळ उमेदवार नसल्यानं मनसेनं वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे का? की इतर पक्षातील नाराज आणि आयारामांना मनसे पक्षात घेणार? हे पाहावं लागेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR