नांदेड : प्रतिनिधी
राज्यात विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. गुरुपुष्यामृत योगाच्या मुहुर्तावर अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. एकूणच राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
अशातच नांदेड जिल्ह्यात मोठी घडामोड होत असून नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार निश्चित करण्यासाठी माजी मुख्यमंत्री व भाजपचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी दिल्ली गाठली आहे.
दरम्यान, राज्यात विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले असून २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघ लढविण्यामध्ये माजी खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी स्वारस्य नसल्याचे स्पष्ट केल्याने नांदेड लोकसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार निश्चित न झाल्याने अशोकराव चव्हाण यांनी तातडीने दिल्ली गाठली.
आज गुरुवार, २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता पार्लमेंटरी बोर्डाची बैठक होणार आहे. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार असून नांदेड लोकसभा उमेदवारावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
एप्रिल-मे महिन्यात पार पडलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नांदेडमधून काँग्रेसतर्फे निवडून आलेले खासदार वसंत चव्हाण यांचे २६ ऑगस्ट रोजी अल्पशा आजारामुळे निधन झाले होते. त्यानंतर नांदेड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसोबतच लोकसभेच्या पोटनिवडणुकीची चर्चा सुरू झाली. काँग्रेस पक्षाने वसंतरावांचे पुत्र प्रा.रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपामध्ये काही इच्छुकांची नावे चर्चेत आहेत परंतु अद्याप उमेदवार जाहीर झाला नाही.