पुणे : प्रतिनिधी
पुण्यातल्या खेड-शिवापूर टोलनाक्यावर पाच कोटींची रक्कम जप्त केल्यानंतर मंगळवारी रात्री उत्तर महाराष्ट्रातील जळगाव-एरंडोलमध्ये नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी पुन्हा कारवाई केली आहे. कारसह पोलिसांनी १ कोटी ५० लाखांची रक्कम जप्त केली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रानंतर उत्तर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या सगळ्या प्रकारावर राष्ट्रावादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आगपाखड केली आहे. त्यांनी ट्वीट (एक्स) करत विरोधकांवर जहरी टीका केली आहे.
रोहित पवार म्हणाले की, दलालीच्या खोक्यांचा पुढचा अंक जळगावमधल्या एरंडोल मध्ये दिसला. गद्दार विकत घेतले म्हणून महाराष्ट्र विकत घेता येईल असा कोणाचा समज असेल तर मग त्यांचा अभ्यास कच्चा म्हणावा लागेल. इथे गुजरातची स्टाईल चालणार नाही, महाराष्ट्र-द्रोह्यांना हा महाराष्ट्र गाडल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की! निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून दलालीच्या पैशांची त्सुनामी येणार असून त्यापूर्वीच दलालीच्या पैशाच्या लाटा धडकायला सुरवात झाली आहे. परवा काही लाटा खेड शिवापूरच्या झाडी डोंगरात धडकल्या. तर मंगळवारी रात्री जळगावच्या एरंडोलमध्येही दलालीच्या पैशांच्या लाटा धडकल्या असून पोलिसांनी दीड कोटी जप्त केल्याची माहिती आहे. हडपसरमध्येही २७ लाख रुपये जप्त झाले आहेत.
दलालीच्या पैशातून महाराष्ट्र विकत घेऊ पाहणा-या दलालखोरांना जनता गाडल्याशिवाय राहणार नाही तसंच महाराष्ट्रात हे ‘गुजरात मॉडेल’ आणि त्यांच्या नेत्यांचे मनसुबे शंभर टक्के उध्वस्त होतील यात कुठलीही शंका नाही, अशी टीका रोहित पवारांनी एक्सच्या माध्यमातून केली आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील एरंडोल-पारोळा मतदार संघातील कासोदा गावात पोलिसांच्या पथकाने नाकाबंदी दरम्यान मंगळवारी रात्री कारमधून दीड कोटींची रोकड जप्त केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विधानसभेचा बिगुल वाजला असून पोलीस प्रशासनातर्फे नाकाबंदी करण्यात आली आहे. जिल्ह्यात या नाकाबंदीमध्ये अनेक वाहनांची तपासणी करण्यात येत असून कासोदानजीक एका वाहनातून रोकड पकडण्यात आली आहे. या कारमधील रोकड एका बड्या राजकीय नेत्याशी संबंधित असल्याचीही जोरदार चर्चा आहे.