26.2 C
Latur
Tuesday, November 26, 2024
Homeलातूरसाडेसतराशे शेतक-यांकडून सोयाबीनची ऑनलाईन नोंद

साडेसतराशे शेतक-यांकडून सोयाबीनची ऑनलाईन नोंद

रेणापूर : प्रतिनिधी
रेणापूर येथील शासनाच्या आधारभूत खरेदी केंद्रावर तालुक्यातील साडेसतराशे शेतक-यांंनी सोयाबीनची ऑनलाईन नोंदणी केली आहे परंतु सोयाबीनमध्ये १९ ते २० टक्के ओलावा असल्यामुळे अद्याप प्रत्यक्षात खरेदीला सुरुवात झालेली नाही. सतत पाऊस व ढगाळ वातावरण असल्यामुळे ९० टक्के शेतक-यांनी सोयाबीनच्या गंजी लावून ठेवल्या आहेत फक्त दहा टक्केच शेतक-याच्या राशी झालेल्या आहेत.
      या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले असून सोयाबीन काळे पडल्याने बाजारात सोयाबीनला भाव मिळत नाही. या वर्षी शासनाने सोयाबीनचा प्रतिकिं्वटल भाव ४ हजार ८९२ रुपये जाहीर केल्यामुळे शेतकरी शासनाच्या आधारभूत खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करीत आहेत. यासाठी केंद्रावर शेतक-यांची मोठी गर्दी होत आहे. बाजारात सोयाबीनच्या दरामध्ये वाढ होत नाही त्यामुळे येथील खरेदी केंद्राकडे शेतक-यांचा कल दिसत आहे.
१५ ऑक्टोबरपासून प्रत्यक्षात सोयाबीनची खरेदी होणार होती परंतु सोयाबीनमध्ये १९ ते २० टक्के ओलावा असल्यामुळे सध्या एकाही पोत्याची खरेदी झाली नाही. मूग व उडदाच्या एकाही पोत्याची नोंद झाली नाही. खरेदी केंद्रावर १ हजार ७५० शेतक-यांंनी सोयाबीनची ऑनलाईन नोंदणी केली आहे. प्रत्यक्षात खरेदीला सुरुवात न झाल्याने खरेदी केंद्रावर हमाल व मजूर दिवसभर बसून असतात. हाताला काम नसल्याने त्यांचे हाल होत असून कामाअभावी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. बाजारात व्यापान्यांकडून शेतक-यांची लूट होऊ नये, सोयाबीनचे दर टिकून राहवेत यासाठी केंद्र व राज्य शासनाने आधारभूत खरेदी केंद्र सुरु केले.
या वर्षी सोयाबीनला ४ हजार ८९२ रुपये दर जाहीर केला आहे. त्यात शेतक-यांना विविध अटी व नियम लागू केले आहेत. १ हजार ७५० शेतक-यांंनी ऑनलाईन नोंदणी केली असली तरी प्रत्यक्षात एकाही शेतक-याने विक्रीसाठी माल केंद्रावर आणला नाही. सतत पाऊस व ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनची राशी झाल्या नाहीत. ९० टक्के शेतक-यांनी सोयाबीनच्या गंजी लावल्या आहेत केवळ १० टक्के शेतक-यांच्या राशी झालेल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR