मुंबई (प्रतिनिधी) : धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी गुरूवारी शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर गोटे यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. गोटे यांना धुळे शहर विधानसभा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. अभ्युदय बँकेचे माजी अध्यक्ष व गांगाखेडचे माजी आमदार सीताराम घनदाट (मामा) यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये आज प्रवेश केला. घनदाट यांना गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
लोकसंग्राम पक्षाच्या माध्यमातून धुळ्यात राजकारण करणारे गोटे हे १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले होते. त्यानंतर २००९ च्या निवडणुकीत ते पुन्हा विजयी झाले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत गोटे यांना एमआयएमच्या फारूक अन्वर शहा यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. गोटे यांना गेल्या निवडणुकीत ४२ हजारांहून अधिक मते मिळाली होती.
सीताराम घनदाट यांचा वंचितमध्ये प्रवेश
गंगाखेडचे माजी आमदार व अभ्युदय बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम घनदाट (मामा) यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीमध्ये आज प्रवेश केला. घनदाट यांना गंगाखेड विधानसभा मतदारसंघाची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.