मुंबई : प्रतिनिधी
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज मुंबईमध्ये आपली दुसरी यादी जाहीर केली. अनेक नेत्यांच्या पक्षप्रवेशानंतर तिथेच त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते एबी फॉर्मचे वाटप करुन उमेदवारी जाहीर करण्यात आली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाच्या दुस-या यादीमधील सात नावे वाचून दाखवली. विशेष म्हणजे या यादीमध्ये काही काळापूर्वी तुरुंगातून जामीनीवर बाहेर आलेले माजी मंत्री नवाब मलिक यांच्या कन्येचा तसेच काही दिवसांपूर्वीच हत्या झालेले नेते बाबा सिद्दीकी यांच्या मुलाचाही समावेश आहे.
दुस-या यादीमधील सात उमेदवार खालीलप्रमाणे :
इस्लामपूर : शरद पवरांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मतदारसंघातून अजित पवारांनी निशिकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या मतदार संघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पाहायला मिळणार आहे. ही लढत पाटील विरुद्ध पाटील अशी असणार असून निशिकांत पाटील यांचा कस येथे लागणार आहे.
तासगाव-कवठे महांकाळ :
माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा पारंपारिक मतदारसंघ असलेल्या या मतदारसंघातून अजित पवारांच्या पक्षाने संजयकाका पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आर. आर. पाटलांचे पुत्र रोहित पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
अणुशक्ती नगर : नवाब मलिक यांच्या अणुशक्ती नगर मतदारसंघातून त्यांची कन्या सना मलिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
वांद्रे पूर्व : या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार वरुण सरदेसाई यांची थेट लढत दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिदिकींशी होणार आहे. अजित पवारांच्या पक्षाने झिशान सिद्दीकींना उमेदवारी दिली आहे. या ठिकाणीची निवडणूक अधिक रंजक होणार आहे.
वडगाव शेरी : पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणानंतर चर्चेत आलेले आणि आरोपीच्या मदतीसाठी धावलेले विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना अजित पवारांच्या पक्षाने पुन्हा एकदा संधी दिली आहे. पोर्शे प्रकरणात नाव आल्याने टिंगरेंच्या उमेदवारीसंदर्भात शंका उपस्थित केली जात होती.
शिरुरमधून ज्ञानेश्वर कटके तर
लोह्यातून माजी खासदार प्रताप चिखलीकर मैदानात
शिरुरमधून अजित पवारांच्या पक्षाने ज्ञानेश्वर (माऊली) कटके यांना तर लोहा मतदारसंघातून प्रताप चिखलीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माजी खासदार असलेल्या चिखलीकर यांनी आजच भाजपामधून अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे.