मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पुढे जात आहे, तसा राजकीय घडामोडींना वेग येत असल्याचे पाहायला मिळत आहे. विविध पक्षांकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येत आहेत. यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. मात्र, या यादीनंतर अवघ्या काही तासांत अजित पवार गटात भाजपा आणि काँग्रेसमधून बड्या नेत्यांनी प्रवेश केला आणि विशेष म्हणजे अजित पवार गटाकडून या नेत्यांना विधानसभेसाठी उमेदवारीही जाहीर करण्यात आली.
सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील, सांगलीचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि आमदार झिशान सिद्दिकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर लगेचच या चारही नेत्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी जाहीर केली. वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार झिशान सिद्दिकी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाने वरुण सरदेसाई यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता झिशान सिद्दिकी विरुद्ध वरुण सरदेसाई अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे.
राज्यातील निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या पक्षांकडून उमेदवारी याद्या जाहीर करण्यात येत आहेत. यात संधी न मिळालेले अनेक नेते, पदाधिकारी नाराज झाल्याचे पाहायला मिळत आहेत. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या फुटीनंतर त्या त्या पक्षातून संधी मिळते का, याची चाचपणी अनेक जण करताना पाहायला मिळत आहे. यातच पुढे आता भाजपातील तीन बड्या नेत्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत तिकीटही मिळवल्याचे पाहायला मिळत आहे.