पुणे : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील मुख्य पीक असलेल्या सीताफळाचा हंगाम सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्याने बाजारात अत्यल्प दर मिळाला. याचा फटका सीताफळ उत्पादकांसह व्यार्पायांना देखील बसला. एकंदरीत यावर्षी सीताफळ हंगाम तोट्यात गेल्याचे शेतर्कयांचे तसेच व्यापा-यांचे म्हणणे आहे.
येथील शेतक-यांचे अर्थकारण हे सीताफळावर अवलंबून असते. मागील वर्षी पावसाने ओढ दिल्याने उन्हाळी हंगामात कमी शेतर्कयांना उत्पादन घेता आले. बहुतांश शेतक-यांनी पावसावरच बहराचे नियोजन केले. सुरुवातीच्या काळात बाजारात मालाची आवक कमी होत होती. त्यामुळे बाजारभाव चांगला मिळत होता. परंतु मागील दोन महिने बाजारात मालाची प्रचंड आवक होत गेली आणि त्यामुळे शेतर्कयांना अत्यल्प बाजारभाव मिळाला आहे.
राज्यभरात सध्या सीताफळाची लागवड वाढत आहे. पुरंदर तालुक्यात तर खूप मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. त्यामुळे बाजारात मालाची प्रचंड आवक होत आहे. या हंगामाचा विचार केल्यास अक्षरश: मातीमोल भावाने आपला माल शेतक-यांना विकावा लागला आहे.
पेरूला मातीमोल भाव
सध्या बाजारामध्ये पेरूचा दर नीचांकी पातळीवर म्हणजे प्रतिकिलोस रुपये १० रूपयाने खाली घसरला आहे. त्यामुळे पेरू उत्पादक शेतक-यांना सध्या मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. बाजारामधील वाढलेली आवक व परराज्यातून पावसामुळे कमी झालेली मागणी, यामुळे पेरूच्या दरात सध्या प्रचंड घसरण झाली आहे. उन्हाळ्यामध्ये पेरूचे दर प्रतिकिलोस रुपये १२५ पर्यंत वधारले होते. मात्र, पेरूच्या दरात प्रचंड घसरण झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.