नगर : प्रतिनिधी
काल जे काही घडले, ते अतिशय वाईट आहे, कुणालाही न शोभणारे आहे, तुम्ही म्हणतात राजकारणात ५० टक्के आरक्षण महिलांना द्यायचे. पण जर असे बोलणारे लोक असतील तर महिलांनी का राजकारणात यावे? याबाबत अशी प्रतिक्रिया जयश्री थोरात यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.
काल नगरमधील संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांच्या संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत भाजपच्या वसंतराव देशमुख या वक्त्याने बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केले.
मी काय वाईट करत होते? मी माझ्या वडिलांसाठी मैदानात होते. माझ्या वडिलांसाठी युवा संवाद यात्रेत फिरण्याचे काम करत होते, प्रत्येक माणसाला भेटण्याचे काम मी करत होते. असे काय वाईट केले होते, की माझ्याबद्दल एवढे वाईट बोलले ? जे वक्तव्य करण्यात आले ते त्यांच्या वयाला शोभणारे आहे का? हे बरोबर आहे की ते विरोधक राहिलेले आहेत, पण विरोधकाला देखील एक पातळी असते. एवढ्या खालच्या पातळीला जाऊन तुमच्या मुलीच्या, तुमच्या नातीच्या वयाच्या मुलीबद्दल असे बोलतात. ते त्यांना शोभणारे नाही .