परभणी : शेती व शेतकरी विकासाकरिता शासन, विद्यापीठ, विविध संस्था यांनी एकत्रित कार्य करण्याची आवश्यकता आहे. शेतकरी बांधवाकरिता आपणास कार्य करण्याची संधी मिळाली आहे. कृषि तंत्रज्ञानाच्या आधारे शेतकरी विविध पिकांचे अधिकाधिक उत्पादन घेत आहेत. आज शेतकरी जो भाजीपाल उत्पादीत करतो त्याच्या विक्रीतील केवळ ३०-३५ टक्केचा हिस्सा शेतकरी बांधवाला मिळतो, बाकी व्यापारांना लाभ होतो. शेतकरी बांधवांना शेतमालाचे दर्जेदार शेतमाल निर्मिती, व्यवस्थापन आणि मार्केटिंग यावर प्रशिक्षित करण्याची आवश्यकता आहे. याकरिता प्रयत्न करण्यात यावेत. परळी तालुक्यात विद्यापीठाची नवीन कृषी व कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालये व एक संशोधन केंद्र स्थापन झाले. यामाध्यमातून आपण अधिक प्रभावीपणे कार्य करू शकतो असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी केले.
ग्लोबल विकास ट्रस्टच्या माध्यमातून परळी तालुक्यातील ४२०० गावांत विविध कृषी विषयक उपक्रम राबविण्यात येत आहेत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ त्यास तांत्रिक पाठबळ पुरवित आहे. गेल्या वर्षी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि ग्लोबल विकास ट्रस्ट यांच्या याकरिता सामंजस्य करार झाला. वर्षभरात विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. दि. २६ ऑक्टोबर रोजी कुलगुरू डॉ इन्द्र मणि यांच्या अध्यक्षेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी ग्लोबल विकास ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मयंक गांधी, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार, ट्रस्टी संजय परमार, श्रीमती गांधी, डॉ. गजेंद्र लोंढे, डॉ. व्ही. एस. खंदारे, डॉ. हिराकांत काळपांडे आदीसह विद्यापीठातील शास्त्रज्ञ व ग्लोबल विकास ट्रस्टचे कर्मचारी उपस्थित होते.
ग्लोबल विकास ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मयंक गांधी यांनी ट्रस्टव्दारे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देताना म्हणाले की, ट्रस्टचे कार्य परळी भागातील ४२०० गांवापर्यंत पोहचले असून शेतकरी बाधंवाचा आर्थिक प्रगती झाली आहे. या कार्याची व्याप्ती वाढविण्याकरिता प्रयत्न करण्यात येत आहे. ट्रस्टच्या माध्यमातून शेतकरी प्रशिक्षणाकरिता जागतिक दर्जाचे प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषि विषयक तांत्रिक पाठबळ भेटत आहे. जास्तीत जास्त फळपिकांची वृक्ष लागवड, शेतीत रासायनिक घटकांचा कमी वापर, हवामान बदलास अनुकूल तंत्रज्ञान आदी बाबींवर भर देण्यात येत आहे असे सांगितले. प्रास्ताविक डॉ. हिराकांत काळपांडे यांनी केले. बैठकीत विद्यापीठ व ट्रस्टच्या माध्यमातुन शेतकरी विकास करिता राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. पुढील कायार्ची दिशा ठरविण्यात आली.