20.7 C
Latur
Saturday, October 26, 2024
Homeमहाराष्ट्रबाबा सिद्दिकी हत्येत बिश्नोईचेच कनेक्शन

बाबा सिद्दिकी हत्येत बिश्नोईचेच कनेक्शन

बिश्नोई गँगवर शिक्कामोर्तब मुंबई क्राईम ब्राँचकडून माहिती

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई क्राईम ब्राँचने बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात अनमोल बिश्नोई याचे कनेक्शन समोर आणले आहे. पोलिसांनी या प्रकरणात केलेल्या सुजीत सिंह या आरोपीच्या चौकशीत नवी माहिती मिळाली असून सुजीत सिंह गँगस्टर अनमोल बिश्नोईच्या संपर्कात होता. त्यामुळे मुंबई पोलिसांनी अनमोल बिश्नोई देखील या प्रकरणात एक आरोपी असल्याचे म्हटले आहे.

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान मुंबई पोलिसांनी ३२ वर्ष वय असलेल्या सुजीत सिंह याला अटक केली आहे. पोलिसांच्या दाव्यानुसार सुजीत सिंहचा गँगस्टर अनमोल बिश्नोई याच्याशी संपर्क होता. पोलिसांच्या माहितीनुसार दोघे संपर्क साधण्यासाठी वेगवेगळ्या अ‍ॅप्सचा वापर करत होते. पोलिसांना त्या अ‍ॅप्स वर बनवण्यात आलेल्या फेक अकाऊंटची माहिती देखील मिळाली आहे.

मुंबई क्राइम ब्रँचला चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार सुजीत सिंहला बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या कटाची पूर्ण माहिती होती. तो लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईच्या संपर्कात होता. सुजीत सिंह अन्य आरोपींना पैसे देणे आणि शस्त्र देण्यामध्ये सहभागी होता. सुजीत सिंह मुंबईतून बाबा सिद्दिकी यांच्या हत्येपूर्वी एक महिना अगोदर फरार झाला होता. मुंबईतून फरार झाल्यानंतर लुधियानामध्ये लपला असेल. मुंबई आणि पंजाब पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अटक केली होती. कोर्टाने सुजीतला ४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.

आरोपींकडून ऑस्ट्रेलियन बनावटीचे शस्त्र
बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील एक आरोपी असलेल्या राम कनौजिया याच्या घरातून एक पिस्तूल जप्त करण्यात आली आहे. पोलिसांना आतापर्यंत चार पिस्तूल मिळाल्या आहेत. मुंबई पोलिसांना तपासात मिळालेल्या माहितीनुसार आरोपींकडे वेगवेगळ्या प्रकारच्या पाच पिस्तूल होत्या. यापैकी एक पिस्तूल ऑस्ट्रेलिया बनावटीची ब्रेटा होती, पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मारेक-यांच्या मोबाईलची तपासणी करण्यात आली त्यावेळी त्यामध्ये पिस्तूलचे फोटो आढळले. त्यानंतर पोलिसांकडून चौथे शस्त्र शोधण्याचे काम सुरु करण्यात आले. एक शस्त्र राम कनौजियाच्या घरात मिळाले. ही पिस्तूल रायगड जिल्ह्यातील पळस्पे नावाच्या ठिकाणी होती, जिथे राम कनौजिया एक घर भाड्याने घेऊन वास्तव्याला होता. दरम्यान, बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी शिवकुमार गौतम, झीशान अख्तर आणि शुभम लोणकर फरार आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR