पुणे : प्रतिनिधी
विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशा राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांची यादी जाहीर होत आहे. मविआतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात महाविकास आघाडीने उमेदवार न देता थेट अपक्षाला पाठिंबा दिला आहे.
मावळ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना महाविकास आघाडीतील शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांची ताकद वाढली आहे. मावळ विधानसभा निवडणुकीत राजकीय रंगत निर्माण झाली आहे. यापूर्वीच तालुक्यातील भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासह हजारो भाजप कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे देऊन महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या उमेदवारीला जाहीर निषेध केला होता.