सोलापूर:दिवाळी सणाची आता सर्वांनाच उत्सुकता लागली असून खरेदीनिमित्त आलेल्या नागरिकांमुळे येथील सर्वच बाजारपेठा फुलून गेल्या आहेत.
येत्या सोमवार, २८ ऑक्टोबर रोजी वसूबारस असून या दिवशी गाय वासराच्या पूजनाने दिवाळी सणाला सुरूवात होते. मंगळवार, २९ रोजी धनत्रयोदशी आहे. गुरुवार, ३१ रोजी नरकचतुर्दशी व शुक्रवार, १ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन व शनिवार, २ नोव्हेंबर रोजी दीपावली पाडवा आणि रविवार ३ नोव्हेंबरला भाऊबीज आहे. आबालवृध्दांचे आकर्षण असलेल्या या सणाच्या खरेदीसाठी नवी पेठ, मधला मारूती, चाटी गल्ली, कोंतमचौक, कन्ना चौक, पूर्व भागातील अशोक चौक परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
दिवाळीतील मिठाई बनविण्यासाठी लागणारे साहित्य, नवीन कपडे, दिव्यांच्या रोषणाईसाठी आकाशकंदील, पणत्या, घरासमोर मांगल्याचे प्रतीक असणारी रंगावली रेखाटण्यासाठी रंगीबेरंगी रांगोळी खरेदीसाठी लोकांची गर्दी उसळल्याचे पाहायला मिळाले. लहान मुलांना फटाक्यांचे मोठे आकर्षण असते. फटाक्यांशिवाय दिवाळीची मजा नसते.
त्यासाठी शहरात फटाक्यांची दालने थाटण्यात आली आहेत.दिवाळीमुळे बाजारात खरेदीचा उत्साह असून व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने सजवली आहेत. मधला मारूती, टिळक चौकसह शहाराच्या वेगवेगळ्या भागातील मिठाईची दुकानेही यानिमित्त सजली आहेत.