सोलापूर – दिवाळीनिमित्त शहरातील व्ही.आय.पी रस्त्यांवर आकर्षक आकाशकंदील, पणती, विविध रंगी रांगोळी, गृहसजावटीच्या वस्तू विक्रीसाठी दाखल झाले आहेत. त्यामध्ये माती पासून बनवलेल्या वैविध्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण अशा आकाशकंदीलला मागणी वाढलेली दिसत आहे. दिवाळी सणाच्या दोन महिन्या अगोदरपासून आकाशकंदील बनवण्यास सुरुवात होती. चायनीज आकाशकंदीलला फाटा देत ग्राहकांनी स्वदेशी आणि पर्यावरणपूरक मातीचे आकाश कंदील खरेदीकडे कल दाखवला आहे.
दरम्यान दिवाळीचा सण उत्साहात साजरा करण्यासाठी प्रत्येक नागरिक महिला आबालूद्ध सज्ज झाले आहेत. विविध वस्तू,साहित्य आदींची खरेदी करण्यासाठी शहरातील विविध बाजारपेठांमध्ये तसेच व्ही.आय.पी रस्त्यांवर ग्राहकांची रेलचेल वाढलेली आहे. दरवर्षी दिवाळी निमित्त आपल्या घरावर आकाशकंदील लावला जातो. तेजोमय प्रकाश पर्व यानिमित्ताने साजरे होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक आकाशकंदील घेण्याकडे ग्राहकांचा कल आहे.
लाल मातीचे पर्यावरणपूरक असणारे आकाश कंदील घेण्याकडे ग्राहक वर्ग आकर्षिला जात आहे. मातीच्या आकाशकंदीलमधून येणारे प्रकाश परावर्तित झाल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा रंगछटा निर्माण होत आहे. त्यानिमित्ताने ग्राहक मातीचे आकाशकंदील घेत आहेत. कोरोना संसर्गजन्य रोग आल्यानंतर मातीचे आकाशकंदील विक्री आणि खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू झाली. तेव्हापासून मातीचे आकाशकंदील विशेष करून मागितले जातात. विविय आकाराचे व नक्षीचे आकाशकंदील ग्राहकांना पसंत पडत आहेत. त्यामुळे या आकाश कंदील बनवण्याकडे सर्वाधिक कल आहे. या आकाशकंदीलचे दर २०० रुपयां पासून ते ५०० रुपयांपर्यंत आहे.