21.4 C
Latur
Monday, November 25, 2024
Homeराष्ट्रीयआयुष्मान योजनेचा होणार विस्तार

आयुष्मान योजनेचा होणार विस्तार

पंतप्रधान मोदी २९ ऑक्टोबरला घोषणा करणार, पोर्टलचेही लॉंचिंग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात देशात अनेक आरोग्यविषयक योजना सुरू करण्यात आल्या. यामध्ये आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआयोग्य योजना ही एक केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत ७० वर्षांपर्यंतच्या नागरिकांना मोफत उपचार मिळत होते. मात्र, आता लवकरच या योजनेचा विस्तार होण्याची शक्यता आहे. आता यापुढे ७० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनाही मोफत उपचार मिळणार आहेत. या योजनेच्या विस्ताराची येत्या २९ ऑक्टोबरला घोषणा होण्याची शक्यता आहे. यासोबतच नियमित लसीकरणाची नोंद ठेवण्यासाठी विकसित केलेले यू-विन पोर्टलही याच दिवशी लाँच केले जाणार आहे.

येत्या मंगळवारी ही घोषणा होण्याची शक्यता आहे. आयुष्मान भारत योजनेच्या विस्ताराची घोषणा झाल्यास ७० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या रुग्णांना मोफत उपचाराची सोय उपलब्ध होणार आहे. या योजनेच्या विस्ताराचा फायदा ४.५ कोटी कुटुंबांमधील तब्बल ६ कोटी नागरिकांना होणार आहे. या योजनेची व्यापकता वाढवल्यानंतर सत्तर वर्षांपेक्षा अधिक वय असलेली कोणतीही व्यक्ती या योजनेंतर्गत उपचार मिळवण्यास पात्र असणार आहे. या योजनेंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत केले जातात. यासोबतच यू-वीन पोर्टलही याच दिवशी लाँच केले जाणार आहे. या पोर्टलच्या माध्यमातून देशातील गर्भवती महिला आणि जन्मापासून ते १७ वर्षांपर्यंत बालकांच्या लसीची प्रत्येक नोंद ठेवली जाणार आहे.

३३ राज्यांसह केंद्रशासित प्रदेशात लागू होणार योजना
पंतप्रधान नरेंद्र मोदी आयुष्मान भारत योजनेच्या विस्ताराची घोषणा करणार असून, ही विस्तारीत योजना देशातील ३३ राज्ये आणि सर्व केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू करण्यात येणार आहे. ही योजना ओडिशा, पश्चिम बंगाल आणि दिल्ली या तीन राज्यांत लागू नसणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी १ सप्टेंबर २०२४ पर्यंत एकूण १२,६९६ खासगी रुग्णालयांसह २९,६४८ रुग्णालय सुचिबद्ध करण्यात आले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR