परभणी : दोन महिन्यांपुर्वी जिल्ह्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे खरीप पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. अनेक शेतक-यांनी पीक विमा कंपनीकडे ऑनलाईन तक्रार केल्या. त्यावर पीक विमा कंपनीने सर्वे केले. त्यानंतर संपुर्ण जिल्ह्यात तात्काळ अग्रिम रक्कम शेतक-यांच्या खात्यात जमा करा असे कंपनीला आदेश देऊन महिना उलटला आहे. तरी देखील पीक विमा कंपनी अग्रिम रक्कम द्यायला तयार नाही. कंपनीचे म्हणने आहे. केंद्र सरकारने त्यांचा हप्ता दिलेला आहे.
राज्य सरकारने त्यांचा हप्ता दिलेला नाही म्हणुन आम्ही पीक विमा अग्रिम देऊ शकत नाही असे त्यांचे म्हणणे आहे. दोन दिवसांत पीक विमा नाही मिळाल्यास शेतकरी विधानसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकणार आहेत असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जिल्ह्यातील शेतक-यांच्या हातातील खरीपचे पिके गेली आहेत. त्यात सोयाबीन, कापुस या पिकांचे उत्पादन निम्याने घटले आहे. त्यात या पिकांचा उत्पादन खर्च सुद्धा भरून निघत नाही. त्यातच जेमतेम हाताला आलेल्या सोयाबीन, कापसाला व्यापा-यांकडून हमीभावापेक्षा कमी भावाने खरेदी राजरोस सुरु आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे नागवला गेला आहे. ही परिस्थिती दरवर्षी शेतक-यां समोर येत असल्यामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या वाढतच चालल्या आहेत.
देशातील सर्वांत मोठा सन दिवाळी दोन दिवसावर आलेली आहे. पीक विम्याची अग्रिम रक्कम शेतक-यांना दोन दिवसांत मिळाली तर दिवाळी सन साजरा करता येईल अशी परिस्थिती जिल्ह्यात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करणार होते परंतू आचारसंहिता असल्यामुळे पोलिस परवानगी देत नाहीत. त्यामुळे दोन दिवसात पीक विमा शेतक-यांच्या खात्यात जमा नाही झाल्यास जिल्ह्यातील शेतकरी गावो गावी विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी किशोर ढगे, रामप्रसाद गमे, गजानन तुरे, मुजाभाऊ लोडे, माऊली शिंदे, राम गोळेगावकर, विठ्ठल चोखट, नामदेव काळे, सुदाम ढगे आदि उपस्थित होते.