ठाणे : सन २०१९ साली राज्याच्या नगरविकास विभागाचे मंत्री राहिलेल्या एकनाथ शिंदे यांची संपत्ती ११ कोटी रुपये एवढी होती. मात्र, २०२२ मध्ये ते राज्याचे मुख्यमंत्री बनले. त्यामुळे, यंदा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना ते मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे, २०२४ ला मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंच्या संपत्तीत तीन पटीने वाढ झाली आहे.
सध्या त्यांची एकूण संपत्ती ३७ कोटी ६८ लाख ५८ हजार १५० रुपये एवढी आहे. गत २०१९ च्या तुलनेत ही संपत्ती २६ कोटी ११ लाख ८५ हजार रुपयांची वाढ आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यावर ५ कोटी २९ लाख २३ हजार ४१० रुपये कर्ज असून त्यांच्या पत्नीवर ९ कोटी ९९ लाख ६५ हजार ९८८ रुपयांचे कर्ज आहे.
विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची उद्या २९ ऑक्टोबर रोजी अंतिम मुदत आहे. त्यामुळे, आज मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षांच्या व मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरुन निवडणुकीच्या मैदानात अधिकृतपणे शडडू ठोकला आहे. राज्यातील दिग्गज नेत्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही बारामती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.
तर, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरातील कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाच्यावतीने महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसैनिक तसेच महायुतीच्या सर्व घटकपक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह यावेळी, मुख्यमंत्र्यांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले. दरम्यान, निवडणूक अर्ज भरतेवेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून एकनाथ शिंदे यांनी एकूण संपत्ती जाहीर झाली आहे. गेल्या ५ वर्षांत मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीत तीन पटीने वाढ झाली आहे.
एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी आवर्जून मुख्यमंत्री शिंदेंच्या अर्ज भरतानाच्या मिरवणुकीत सहभागी होत विजयी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. ठाणे शहरातील महायुतीचे तीनही उमेदवार विजयी करत या शहरावर विजयाचा भगवा पुन्हा फडकवण्याचा निर्धार यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. येथील मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना होत असून शिवसेना ठाकरे गटाकडून दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना तिकीट देण्यात आलं आहे. तर, मनसेकडूनही येथील मतदारसंघात उमेदवार उतरविण्यात येणार आहे.