लातूर : प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेणापुरच्या भाजपा पदाधिका-यांनी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या उपस्थितीत दि. २८ ऑक्टोबर रोजी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी या सर्व पदाधिका-यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.
रेणापूर तालुक्यांतील भाजपचे नेते तथा पणगेश्वर साखर कारखान्याचे संचालक व लातूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेश लहाने यांच्यासह रेणापुर पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप घोडके, वंजारी सेवा संघाचे महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख सुग्रीव मुंडे, रेणापूर नगर पंचायतीचे भाजपचे नगरसेवक गटनेते गजेंद्र चव्हाण, माजी सरपंच गोविंद नागरगोजे, सुरेश केंद्रे, वंजारवाडीचे पोलीस पाटील सीताराम केदार, रमेश केंद्रे, वैजनाथ लहाने, जीवा पैलवान यांच्यासह अनेक भाजपा पदाधिका-यांनी सोमवारी राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या उपस्थितीत आशियाना निवासस्थानी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून सर्व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांचे दिलीपराव देशमुख यांनी स्वागत केले.
या भाजपा नेत्यांच्या प्रवेशामुळे रेणापूर तालुक्यांतील भाजपला मोठे भगदाड पडले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या प्रवेशाने काँग्रेस महाविकास आघाडीचे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार धिरज विलासरावजी देशमुख व काँग्रेस पक्षाची ताकत वाढणार असल्याचे चित्र आहे. यावेळी राज्य साखर महासंघाचे सदस्य आबासाहेब पाटील, जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, पंचायत समितीचे माजी उपसभापती अप्पासाहेब मुंडे, रेणा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा संचालक यशवंतराव पाटील, रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव, रेणापूर बाजार समितीचे माजी सभापती चंद्रचुड चव्हाण, जनार्दन वंगवाड, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष शामराव भोसले, अॅड. बाबासाहेब गायकवाड, अभिजित चव्हाण, रेणा कारखान्याचे संचालक डॉ. हरिदास यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.