20 C
Latur
Friday, November 22, 2024
Homeमुख्य बातम्यालातुरात भाजपला धक्का!; माजी खासदार शृंगारे काँग्रेसमध्ये

लातुरात भाजपला धक्का!; माजी खासदार शृंगारे काँग्रेसमध्ये

लातूर : प्रतिनिधी
आज विधानसभा उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून, राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. लातूरच्या राजकारणात सध्या मोठी घडामोड घडली असून भाजपला धक्का देत माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

दरम्यान, लातूर विधानसभा मतदारसंघ आणि लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख आणि आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी आज मंगळवार (दि. २९ ऑक्टोबर) रोजी शहरातून भव्य मिरवणुकीने जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. दुपारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे त्यांच्या प्रचाराची सभा झाली. या सभेत भाजपचे माजी खासदार शृंगारे यांनी जाहीर प्रवेश करत काँग्रेसच्या बाजूने भक्कम उभे राहणार असल्याचे सांगितले.

सुधाकर शृंगारे यांचा राजकारणाचा पिंड नव्हता तरीही २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पावणेतीन लाख मताधिक्य घेऊन विजय मिळवला होता. मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघांत त्यांच्या खासदार निधीतून कामे झाले होती. विविध उपक्रमांना ते आर्थिक मदतही देत होते. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना भाजपांतर्गत राजकारणाचा दगाफटका झाल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या.

निवडणूक प्रचार शुभारंभ सभेस जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे, शहर जिल्हाध्यक्ष राजा मणियार, शिवसेनेचे सुनील बसपुरे, शेतकरी कामगार पक्षाचे उदय गवारे, कम्युनिस्ट पार्टीचे संजय मोरे, आम आदमी पार्टीचे प्रदीप भोसले, सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR