बीड : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यासाठी काही तास शिल्लक असताना बीड विधानसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट आल्याचे बघायला मिळाले आहे. जयदत्त क्षिरसागर यांनी बीड विधानसभा मतदारसंघासाठी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांनी कुठलेही शक्तिप्रदर्शन केले नाही. महापुरुषांचे आशीर्वाद घेऊन आज मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी त्यांनी पुतण्याविरोधात दंड थोपटलेले दिसून आले आहे.
राज्यात सध्या काका-पुतण्यांची लढत अख्ख्या महाराष्ट्रात चालू आहे. यात किती पुतणे आणि किती काका हे अंकगणित नाही तर केमिस्ट्री आहे. लोकांची साथ कोणी दिली, लोकांची सेवा कोणी केली, हे लोकांना आरशाप्रमाणे माहीत आहे. कोण कोण येत आहे, ते सर्वांना माहीत आहे.
टोलवाले, मटकेवाले, गुटखेवाले, दारूवाले, क्लबवाले, पत्त्यावाले. मी सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन चालणारा माणूस आहे. या शहराचा नाहीतर जिल्ह्याचा आणि मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी मी प्रयत्नशील असेल. सत्ता हे माझं अंतिम साध्य नाही, तर साधन आहे. मूलभूत सुविधा पुरवणे हे माझे प्राधान्य आहे, अशी प्रतिक्रिया अपक्ष उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी दिली आहे.
नुकतेच बीड विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाचे योगेश क्षीरसागर यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला होता. बीड विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार ठरला नसतानाच उमेदवारी अर्ज भरण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यामुळे बीड विधानसभा मतदारसंघात संदीप क्षीरसागर विरुद्ध जयदत्त क्षीरसागर असा संघर्ष होणार आहे. आता यात दुसरा पुतण्या डॉक्टर योगेश क्षीरसागर यांची भर पडली आहे.
निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेत्यांना पक्षांनी उमेदवारी देण्याचे मान्य केले आणि मग उमेदवार सुद्धा अगदी प्रचाराच्या कामाला लागले. मात्र तिकिट जाहीर होण्याची वेळ आली आणि या नेत्यांची नावे मागे पडली आणि अचानक दुस-याच नेत्यांची नावे जाहीर झाली. यामुळे बीडमध्ये सगळ्याच मतदारसंघांमध्ये मोठी बंडखोरी झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.