मुंबई (प्रतिनिधी) : महायुतीचे नेते मुख्यमंत्री पदाबाबत चकार शब्द काढत नसले तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच होईल व मनसे सत्तेत असेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. लोकसभेला आम्हाला जागा सोडल्या नाही, शिवसेनेच्या चिन्हावर लढा, असे सांगितले. मी ते मान्य केले नाही. माझ्याकडे स्वत:चे नाव व चिन्हं आहे. ते मी कमावले आहे, ढापलेले नाही, असा सणसणीत टोलाही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. शिंदेंच्या शिवसेनेने अमित ठाकरे यांच्या विरुद्धचा उमेदवार मागे न घेतल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी पुढील काळात मनसे भाजपासोबतच राहणार असल्याचे सूचित केले. २०२४ चा मुख्यमंत्री भाजपाचा असेल व मनसेच्या पाठिंब्यावरच हा भाजपचा मुख्यमंत्री होईल, असा दावा करताना, २०२९ चा मुख्यमंत्री मनसेचा असेल, असे भाकितही त्यांनी वर्तवले. राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढवत आहेत. दोन्ही शिवसेनेने त्यांच्या विरुद्ध उमेदवार उभे केले आहेत. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, अमित विरोधात माहिममध्ये उमेदवार देणे हा प्रत्येकाचा स्वभावाचा भाग झाला आहे. प्रत्येक जण आपल्या स्वभावानुसार वागत असतो. भाजपसारख्या मॅच्युअर्ड पक्षाने पाठिंबा दिला. सगळ्यांनाच हे कळेल असं नाही. बाकी प्रत्येकाचे मिळेल ते ओरबाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आपण कोणाला कुठे आणि किती सांगायला जाणार? असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.
मी शिवसेनेतून बाहेर पडलो, पक्ष फोडला नाही
फोडाफोडीच्या राजकारणावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, मी पक्ष फोडला नाही. मला पक्षातून इतर नेते फोडून पक्ष निर्माण करायचा नव्हता. शिवसेनेतून बाहेर पडलो तेव्हा शक्य असूनही आमदार फोडले नाहीत. सत्तेत येण्यासाठी कितीही वेळ लागला तरी चालेल; पण अशाप्रकारे फोडाफोडी करून कधीही सत्ता नको आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.