रेणापूर : प्रतिनिधी
लातूर-अंबाजोगाई महामार्गावर निवाडा पाटीजवळ खाजगी टॅव्हल्सने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने त्यात दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी दुपारी ३. ४५ वाजण्याच्या सुमारास घडली. बाळकिशन हरिचंद्र मोरे वय ४९ वर्षे रा. पोहरेगाव (ता रेणापूर) जि लातूर असे मयत व्यक्तीचे नाव आहे .
बाळकिशन हरिचंद्र मोरे वय ४९ वर्षे रा. पोहरेगाव (ता रेणापूर) हे दि ३० ऑक्टोबर रोजी दुपारी दुचाकी क्र . एमएच २४ बी यू १७९१ वरून कामानिमित्त पोहरेगाव येथून रेणापूर येथे जात असताना दुपारी ३ .४५ वाजण्याच्या सुमारास लातूर-अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गावरील निवाडा पाटीजवळ आले असता याच दरम्यान अंबाजोगाई तालुक्यातील सायगाव येथून लग्नाचे व-हाड उदगीरकडे घेऊन निघालेल्या खाजगी टॅव्हल्स क्र . एम एच २४ एबी ७३७३ च्या चालकांने त्याच्या ताब्यातील टॅव्हल्स भरधाव वेगात चालवून दुचाकीला पाठी मागून जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील बाळकिशन मोरे यांच्या डोक्यास जब्बर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सदर टॅव्हल्स चालक घटना स्थळावरून आपली टॅव्हल्स घेऊन पसार होत असताना तेथील काही नागरीकांनी पाठलाग करीत पोलीसांना या घटनेची माहिती दिली.
त्यावरून बीट जमादार बालाजा डप्पलवाड यांनी सदर टॅव्हल्स रेणापूर शहरात येताच आडवून पोलीस ठाण्यात नेऊन चालकाला ताब्यात घेतले. दरम्यान मयत बालकिशन मोरे यांच्या पोहरेगाव येथे शवविच्छेदन केल्यानंतर रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. बालकिशन मोरे हे पोहरेगाव येथील विद्यमान सरपंच ज्योती मोरे यांचे पती होत. बालकिशन मोरे यांच्या पश्चात चार बहिणी व एक पुतण्या असा परिवार असून त्यांच्या मृत्यूने पोहरेगाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे . पोलिसांनी घटनास्थळी भेट घेऊन पंचनामा केला असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरिक्षक प्रदीप काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार बालाजी डप्पलवाड हे करीत आहेत.