छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
दिवाळी सण म्हटलं की गोड पदार्थ आलेच. दिवाळीमध्ये मिठाई मोठ्या प्रमाणात विकली जाते. पण या मिठाईसाठी भेसळयुक्त खवा वापरला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भेसळयुक्त खवा तयार करणा-या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. याठिकाणावरून तब्बल ४२५ किलो खवा पोलिसांनी जप्त केला. भेसळयुक्त खवा विकून ऐन दिवाळीत नागरिकांच्या जीवाशी खेळ करण्याचे काम सुरू असल्याचा प्रकार उघड झाला आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या पडेगाव परिसरामध्ये पामतेल, वनस्पती तूप, खाण्याचा सोडा, मिल्क क्रीम वापरून फक्त अर्ध्या तासात भेसळयुक्त खवा तयार करण्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. पोलिसांनी मिल्क अँड डेअरी प्रॉडक्टच्या नावाखाली सुरू असलेल्या कारखान्यावर छापा टाकून ४२५ किलो भेसळयुक्त खवा जप्त केला. याप्रकरणी गिरेनसिंग बच्चनलालसिंग याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे त्याच्याविरुद्ध यापूर्वीदेखील भेसळयुक्त खवाप्रकरणी छावणी ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
पोलिसांच्या पथकाने गिरेनसिंग बच्चनलालसिंग याच्या ‘दिव्यांश मिल्क अँड डेअरी प्रॉडक्ट’वर छापा टाकून जवळपास ६ क्विंटल बनावट खव्याचे साहित्य जप्त केले. दिवाळीनिमित्त शहरात मिठाईत लाखो रुपयांची उलाढाल होणा-या बाजारपेठेत मात्र मिठाई तयार करण्यासाठी वापरला जाणारा खवाच बनावट वापरला जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे..