मुंबई : विशेष प्रतिनिधी
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत आहे. महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनी आपला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केलेला नाही. त्यामुळे निवडणुक निकालानंतर ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री अशी शक्यता आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करण्याची मागणी केली होती. पण काँग्रेस आणि शरद पवार गटाने यासाठी स्पष्ट नकार दिला. आता एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी , सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होऊ शकतात. असे स्पष्ट केले.
आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आले की, जर सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होत असतील. तर तुमची भूमिका काय असेल. यावर बोलताना ते म्हणाले की, जनताच याचा निर्णय घेईल. महाराष्ट्राच्या हिताची चर्चा करणाराच मुख्यमंत्री होऊ शकतो. आमचा लैंगिक समानतेवर विश्वास आहे. त्याआधी जयंत पाटील म्हणाले होते की, सुप्रिया सुळे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होऊ शकतात.
ते पुढे म्हणाले की, ही लढाई वैयक्तिक नाही. हा महाराष्ट्राचा लढा आहे. जे भाजप करत आहे. आम्ही तसे नाही. महाराष्ट्राला लुटणा-या राजवटीला हटवायचे आहे हे जनतेने ठरवले आहे. मी सरकार म्हणणार नाही. आपल्या हिताचे सरकार बनवण्याची ही शेवटची संधी आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला जास्त जागा मिळाल्याच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्ही युतीमध्ये आहोत आणि ही विश्वासाची युती आहे. ही भाजपसारखी घोषणांची युती नाही. कोणाच्या तरी आनंदावर रागावणारे आपण नाही. जर आमच्या मित्रांनी चांगली कामगिरी केली तर आम्ही आणखी आनंदी आहोत. कोणाच्या दु:खात सुखी होणारे लोक आपण नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.