परभणी : शेक हॅण्ड फाउंडेशन आयोजित आधार निराधारांना अंतर्गत दिवाळी कार्यक्रमात शिवाजी इंजिनिअरिंग कॉलेज येथे ५१ निराधार गरजू आत्महत्याग्रस्त विधवा महिलांना दिवाळी फराळ, किराणा, दिव्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी नांदेड येथील कवयित्री सारिका उबाळे उपस्थित होत्या. विधवा महिलांनी समर्थपणे परिस्थितीचा सामना करून आत्मनिर्भर बनावे असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रतिभा शेळके यांनी स्वत: परिस्थितीतून बाहेर पडून कशा प्रकारे पतीच्या निधनानंतर देखील वस्तीगृह चालू ठेवून समर्थपणे चालवले या विषयी माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह. भ. प. गोविंद महाराज पौंढे उपस्थित होते. यावेळी सिनेट सदस्य नारायण चौधरी उपस्थित होते. प्रास्ताविक शाम गाडेकर तर आभार संतोष चव्हाण यांनी मानले. सूत्रसंचालन ज्योती चौंडे यांनी केले. ग्रामीण भागातून बाभुळगाव, उमरी, रायपूर, पिंपळा, लोन, थोरावा, पडेगाव, आडगाव, अंजनवाडा, खरबा, कुप्टा, परभणी, सोन्ना, पांगरी आदी गावच्या निराधार आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला उपस्थित होत्या.
या किटसाठी शेक हॅण्डच्या ५३ जणांनी मदतीचा हात पुढे केला. कार्यक्रमासाठी शेक हॅण्डच्या रोहिदास कदम, राजू पांचाळ, नितीन तांदळे, मुंजाभाऊ शिळवणे, रवी लोहट, भरत भालेराव, कृष्णा पांचाळ, भास्कर वाघ, अजय महाजन, अर्चना पावडे, सुलक्षणा देशमुख, सीमा चौधरी, पांडुरंग चव्हाण, शरद लोहट आदींनी परिश्रम घेतले.