मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. मुंबईतील माहिम विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
मनसेकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमित ठाकरेंच्या विरुद्ध शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि ठाकरे गटाचे महेश सावंत हे मैदानात उतरले आहेत. काही दिवसांपूर्वी अमित ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आता अमित ठाकरेंच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे.
अमित ठाकरेंकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. अमित ठाकरे हे सध्या माहिम विधानसभा मतदारसंघात प्रचार करत आहेत. अमित ठाकरेंसह त्यांची पत्नी मितालीही प्रचारात उतरली आहे. अमित ठाकरे हे त्यांच्या मतदारसंघात घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. यावेळी ते सर्व मतदारांच्या घरी जाऊन भेट देत आहेत. तसेच सर्व मतदारांशी संवाद साधतानाही ते दिसत आहेत. यावेळी अमित ठाकरेंनी ते कोणत्या मुद्यांवर ही निवडणूक लढवत आहेत, त्यांच्याकडे मत मागण्यासाठी का आले आहेत, याबद्दलही सांगितले आहे.