23.9 C
Latur
Tuesday, November 5, 2024
Homeमहाराष्ट्रलक्ष्मीपूजनामुळे खरेदीला उत्साह!; झेंडूच्या फुलांनी फुलल्या बाजारपेठा

लक्ष्मीपूजनामुळे खरेदीला उत्साह!; झेंडूच्या फुलांनी फुलल्या बाजारपेठा

कराड : प्रतिनिधी
लक्ष्मीपूजन असून गुरुवारी सायंकाळपासून सातारामधील बाजारपेठा फुलल्या आहेत. बाजारामध्ये फुलांची मोठी आवाक झाली असून बाजारपेठ केशरी व पिवळ्या रंगाने अक्षरश: न्हावून गेली आहे. फुलांबरोबरच शहरामध्ये विविध साहित्य खरेदीसाठी गर्दी होती.
दरम्यान, देशामध्ये दिवाळी सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. दिव्यांची आरास आणि फुलांची सजावट केली जात आहे. दिवाळीला उत्साहात प्रारंभ झाला असून सर्वत्र आनंदाचे व चैतन्याचे वातावरण दिसत आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजनाचा दिवस सर्वांत महत्त्वाचा समजला जातो.

लक्ष्मी व कुबेर या दोन्ही देवता धन-संपत्ती देणारे मानले जातात. त्यामुळे घरात लक्ष्मी नांदावी, आर्थिक सुबत्ता यावी, नोकरी, व्यवसायात यश यावे, सुख, शांती लाभावी, यासाठी अमावास्येच्या सायंकाळी लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने शहरातील दत्त चौक, कन्या शाळा व मुख्य बाजारपेठ परिसरात लक्ष्मीचे फोटो, मूर्ती, तयार पूजेचे साहित्य, झेंडूची फुले, केरसुणी, चुरमुरे, बत्ताशांची पाकिटे, कोहळा, आंब्यांची डहाळे, ऊस, नारळ, नारळाच्या झावळ्या आदी प्रकारचे साहित्य विक्रेत्यांकडून खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होती.

दिवाळीत लक्ष्मीपूजन हाच मुख्य दिवस असल्याने, यासाठी लागणारी पिवळी, लाल झेंडूची फुलेही मोठ्या प्रमाणात विक्रीस आली आहेत. ८० ते १०० दरम्यान, प्रतिकिलो फुलांचा दर होता. झेंडूची व इतर फुले खरेदी करताना नागरिक दिसत होते. त्याचबरोबर पूजेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पाच फळे लागत असल्याने, ती घेण्यासाठी बाजारामध्ये गर्दी झाली आहे. तसेच घराला लावायची कृत्रिम फुलांची आकर्षक तोरणे, माळा, हार, आंब्याच्या पानांची प्लास्टिक तोरणे व विविध साहित्य विक्रीस आले आहे. शोभेच्या कुंड्या, विविध सजावटीच्या शोभेच्या वस्तू आदी सर्व साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केल्याने शहरातील बाजारपेठ अक्षरश: गजबजून गेली आहे.

लक्ष्मीपूजनाबरोबरच वही व चोपडी पूजनालाही व्यापा-यांमध्ये महत्त्व आहे. त्यामुळे वह्या खरेदीही मोठ्या प्रमाणात करण्यात येत होती. तसेच लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज सलग असल्याने मिठाईच्या दुकानांमध्येही खरेदीसाठी गर्दी होती. खरेदीसाठी नागरिकांनी एकच गर्दी केल्याने शहर गर्दीने फुलून गेले आहे. सर्वत्र नवचैतन्य असून हिंदू संस्कृतीमधील सर्वांत मोठ्या दिवाळी सणाचा उत्साह दिसून येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR