मुंबई : मुंबईचे आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे महाराष्ट्र डीजीपीचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. पुढील डीजीपी निवडीसाठी मुख्य सचिवांना ०५ नोव्हेंबर २०२४ (दुपारी १.०० वाजता) पर्यंत वेळ देण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तीन आयपीएस अधिका-यांची नावे निर्धारित वेळेत आयोगाकडे पाठवावी लागतील.
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या डीजीपी रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या तक्रारींवर कारवाई करत, केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या डीजीपी रश्मी शुक्ला यांची तात्काळ बदली करण्याचे आदेश दिले.
त्यानंतर आता विवेक फणसळकर हे १९८९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकात अतिरिक्त महासंचालक म्हणून त्यांनी जबाबदारी पाहिली आहे. आणि त्यापाठोपाठ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रमुखपदीही ते होते. कडक शिस्त आणि प्रामाणिकपणा या त्यांच्या गुणांमुळे ते खात्यात ओळखले जातात.
महाराष्ट्र केडरमधील तीन वरिष्ठ अधिकारी
१. संजय वर्मा, डीजी कायदा आणि तंत्रज्ञान
२. रितेश कुमार, डीजी होमगार्ड
३. संजीव कुमार सिंघल
दरम्यान, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार केंद्रीय निवडणूक आयोगाला संजय वर्मा, रितेश कुमार आणि संजीव कुमार सिंघल यांच्या नावाची शिफारस केली जाण्याची शक्यता आहे.
रश्मी शुक्लांविरोधात तक्रारींचा डोंगर
केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात तक्रारी आल्या होत्या. महाविकास आघाडीने रश्मी शुक्ला यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी काँग्रेसची ही मागणी फेटाळून लावली होती. मात्र, आता या तक्रारीवर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. रश्मी शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात निष्पक्ष निवडणुका होत नसल्याची भीती काँग्रेसने व्यक्त केली होती.